पुणे प्रतिनिधी
पुणे : खासगी रुग्णालयावरील प्रस्तावित कारवाई टाळण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तक्रारदार डॉक्टर महिलेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने त्यांना पकडले.
तक्रारदार डॉक्टर महिलेचे विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील कथित अनियमिततेबाबत महापालिकेकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी रुग्णालयात गेलेल्या डॉ. चकोर यांनी, त्रुटी आढळल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होऊ शकते, असे सांगत कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
यानंतर तक्रारदार डॉक्टरकडून १५ हजार रुपये घेण्यात आले. उर्वरित रक्कम घेण्यासाठी शनिवारी (२६ सप्टेंबर) त्यांना नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बोलावण्यात आले होते. याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. चकोर यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी डॉ. चकोर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ, सतीश वाळके यांच्यासह एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.


