नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शुक्रवारी जंतर-मंतर परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) नेत्या नेहा बोरा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह ६० हून अधिक आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. तसेच नवी दिल्ली जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध घालणारे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम १६३ लागू करण्यात आले होते. आंदोलक जंतर-मंतरच्या दिशेने जमा होऊ लागल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर अनेक आंदोलकांना बसमधून दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
आंदोलनादरम्यान योगेंद्र यादव यांनी ज्ञानेश कुमार आणि भाजप यांच्यातील संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रशांत भूषण यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांनी SIR प्रक्रियेविरोधात आपली भूमिका मांडत निवडणूक प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी आंदोलकांशी केलेल्या कथित गैरवर्तनाबाबतही काही कार्यकर्त्यांनी आरोप केले आहेत.


