ठाणे प्रतिनिधी
ठाणे शहरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा (PSI) मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. किसन भोईर असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत काही दारूची दुकाने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर PSI किसन भोईर परिसरात गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असलेला राजू वाल्मिकी पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला हटकून पोलीस वाहनात बसण्यास सांगितले. यावरून भोईर आणि वाल्मिकी यांच्यात वाद झाला.
वाद वाढल्यानंतर राजू वाल्मिकी याने PSI किसन भोईर यांना जोरात धक्का दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या धक्क्यामुळे भोईर यांचा तोल जाऊन ते जमिनीवर डोक्याने आदळले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


