पुणे प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससेवेवरही त्याचा परिणाम होणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याने स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही बसथांबे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहेत. प्रवाशांनी बस पकडण्यासाठी संबंधित पर्यायी थांब्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मध्यवर्ती भागातील शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कर्वे रस्ता या प्रमुख मार्गांवरील बस वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील नेहमीच्या स्थानकांऐवजी पीएमपीच्या बसेस काही ठिकाणी पर्यायी बसथांब्यांवरून सोडण्यात येणार आहेत.
शाहू महाराज स्थानक, स्वारगेट येथून सातारा रस्त्याने कात्रज आणि मार्केट यार्डच्या दिशेने जाणाऱ्या बसेस लक्ष्मीनारायण चौकातून सोडण्यात येणार आहेत. सिंहगड रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या बसेससाठी नटराज बस स्थानकाऐवजी पर्वती पायथा येथील स्वामी समर्थ मठाजवळील बसथांबा वापरण्यात येणार आहे.
स्वारगेट स्थानकाबाहेरून सोलापूर रस्त्याने पुलगेट आणि हडपसरकडे जाणाऱ्या बसेस स्वारगेट डेपोच्या जवळील वेगा सेंटर येथून सोडण्यात येणार आहेत. तसेच भवानी पेठ, नानापेठ आणि रास्ता पेठकडे जाणाऱ्या बसेससाठीही याच परिसरातील पर्यायी थांब्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, डेक्कन जिमखाना बस स्थानकावरून कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटच्या दिशेने जाणाऱ्या बसेस एसएनडीटी महाविद्यालयाजवळील पर्यायी ठिकाणाहून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे डेक्कन परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नेहमीच्या बसथांब्यावर बसची प्रतीक्षा न करता पर्यायी स्थानकाची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पुण्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.
त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी बसच्या नियमित थांब्यांमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा. मिरवणुकीमुळे होणारी गर्दी आणि वाहतूक बदल लक्षात घेता प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्ग व तात्पुरत्या बसथांब्यांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे.


