पुणे प्रतिनिधी
तुरुंगातून बाहेर पडताच पुण्यातील युट्यूबर आणि सामाजिक प्रश्नांवर व्हिडीओच्या माध्यमातून आवाज उठविणारे संतोष पंडित पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या प्रकरणात सुमारे १४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर सुटका झालेल्या पंडित यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पहिल्याच व्हिडीओत पुण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ज्या रस्त्याने नेले, त्याच रस्त्यावरील खड्ड्याला त्यांनी फुलांचा हार घालत महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर उपरोधिक भाष्य केले.
वाघ परत मैदानात🔥🔥
सत्ता, पैसा, पॉवर असून चालत नाही, बुडात दम बी असावा संतोष पंडित यांच्या सारखा! pic.twitter.com/1piHNw6SyV— 🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास (@kisora_pat7606) September 22, 2026
‘मला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर ज्या रस्त्याने नेलं, त्याच रस्त्यात हा खड्डा आहे. याच खड्ड्यातून पोलिसांची गाडी गेली,’ असे सांगत पंडित यांनी खड्ड्याला हार घातला. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला असून, नागरिकांनीही पुण्यातील रस्त्यांची अवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात ऐरणीवर येतो. खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे अपघात होणे, वाहनांचे नुकसान होणे आणि वाहतुकीचा खोळंबा होणे, या समस्या कायम आहेत. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण, संबंधित रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्यांवर किती वेळा कारवाई झाली आणि निकृष्ट कामासाठी जबाबदारी निश्चित केली जाते का, असे सवाल पंडित यांनी उपस्थित केले.
विशेष म्हणजे, यावेळी पंडित यांनी आक्रमक किंवा आक्षेपार्ह भाषा न वापरता संयतपणे आपली भूमिका मांडली. एखाद्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात काम किती वेगाने केले जाते, दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा पडल्यास त्याची जबाबदारी कोणाची आणि त्या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमा राबवल्या जातात. मात्र काही ठिकाणी दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा खड्डे पडत असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्यापेक्षा रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणे आणि निकृष्ट कामासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचा मुद्दा पंडित यांच्या व्हिडीओतून पुढे आला आहे.
संतोष पंडित यांचा हा व्हिडीओ त्यांच्या सुटकेनंतरचा पहिला व्हिडीओ असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठविण्याची त्यांची पद्धत यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वैयक्तिक वादाऐवजी पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला हात घातल्याचे या व्हिडीओतून दिसून आले.
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपावरून पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ सप्टेंबरला रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. या प्रकरणातील वक्तव्याबाबत त्यांनी माफीही मागितली आहे.
जामिनावर बाहेर आल्यानंतरही सामाजिक प्रश्न मांडत राहणार असल्याची भूमिका पंडित यांनी स्पष्ट केली आहे. त्याची सुरुवातच त्यांनी पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नापासून केली आहे. पोलिसांनी ज्या रस्त्याने नेले, त्याच रस्त्यावरील खड्ड्याला हार घालण्याची कृती करत त्यांनी प्रशासनासमोर एक साधा पण बोचरा प्रश्न ठेवला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे हे खड्डे नेमके कधी बुजणार आणि त्यासाठी जबाबदारी कोणाची?
पंडित यांच्या या व्हिडीओनंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती होते का, तसेच पुण्यातील इतर धोकादायक खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासन काय उपाययोजना करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

