मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भारतीय टपाल विभागाने देशभरातील ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) पदांची भरती जाहीर केली आहे. ‘ग्रामीण डाक सेवक शेड्यूल-II, जुलै २०२६’ अंतर्गत देशातील ३९ पोस्टल सर्कलमध्ये एकूण २३ हजार ७५७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील विविध विभागांमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांचा समावेश असून महाराष्ट्रासाठी एकूण २ हजार ४३१ जागा उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी उमेदवाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी हे विषय असणे आवश्यक आहे. संबंधित पोस्टल सर्कलची अधिकृत भाषा उमेदवाराला वाचता, लिहिता आणि समजता येणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मराठी ही अधिकृत भाषा आहे, तर गोवा राज्यासाठी कोकणी/मराठी भाषेतील पदांचा समावेश करण्यात आला आहे.
BPM पदाची जबाबदारी मोठी; ABPM आणि डाक सेवकांनाही विविध कामे
ब्रँच पोस्ट मास्टरला संबंधित ब्रँच पोस्ट ऑफिसचे दैनंदिन कामकाज सांभाळण्याबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि पोस्टाच्या व्यवसायाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरकडे टपाल तिकीट व स्टेशनरी विक्री, टपालाची ने-आण व वितरण तसेच पोस्ट मास्टरला विविध कामांमध्ये सहकार्य करण्याची जबाबदारी असेल. डाक सेवकांना लाईन सब ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस, रेल्वे मेल सर्व्हिसेससह विभागानुसार देण्यात आलेली कामे करावी लागतील.
उमेदवारांना संगणक, लॅपटॉप, POS मशीन आणि मोबाईल यांसारखी उपकरणे वापरण्याचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. याबाबत निर्धारित नमुन्यात घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. तसेच सायकल चालविता येणे हीदेखील आवश्यक अट आहे. सायकलऐवजी स्कूटर किंवा मोटारसायकल चालविता येत असल्यास ती अटही ग्राह्य धरली जाणार आहे.
BPM पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला संबंधित ब्रँच पोस्ट ऑफिससाठी कार्यक्षेत्रात आवश्यक जागेची व्यवस्था करावी लागेल. तसेच BPM पदावरील व्यक्तीला संबंधित पोस्ट ऑफिसच्या गावात वास्तव्यास राहणे आवश्यक आहे. ABPM आणि डाक सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला संबंधित पोस्ट ऑफिसच्या वितरण क्षेत्रात राहावे लागेल.
वयाची अट आणि आरक्षण
२१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ आणि कमाल ४० वर्षे असावे. इतर मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्षांपर्यंत, अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल वयोमर्यादा ५० ते ५५ वर्षांपर्यंत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वतंत्र वयोमर्यादा सवलत मिळणार नाही.
दृष्टिदोष, कर्णबधिरता, एक हात किंवा एक पाय बाधित असलेले, कुष्ठरोगातून बरे झालेले तसेच ॲसिड हल्ल्यात बाधित उमेदवारांना नियमानुसार या भरतीत अर्ज करता येणार आहे. संबंधित आरक्षणाच्या नियमांनुसार दिव्यांग उमेदवारांसाठी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
BPM ला १९ हजारांपेक्षा जास्त, ABPM/डाक सेवकांना सुमारे १६ हजारांचे मानधन
ग्रामीण डाक सेवकांना टाइम रिलेटेड कंटिन्युइटी अलाऊन्स (TRCA) आणि नियमानुसार महागाई भत्ता मिळणार आहे. BPM पदासाठी TRCA श्रेणी १२ हजार ते २९ हजार ३८० रुपये असून अंदाजे मासिक वेतन १९ हजार २०० रुपये आहे. ABPM आणि डाक सेवक पदासाठी TRCA श्रेणी १० हजार ते २४ हजार ४७० रुपये असून अंदाजे मासिक वेतन १६ हजार रुपये आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार महागाई भत्ताही लागू राहणार आहे.
दहावीच्या गुणांवर निवड
या भरतीमध्ये स्वतंत्र लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. उमेदवाराने अर्ज करताना दिलेल्या पदांच्या पसंतीक्रमाचाही निवड प्रक्रियेत विचार केला जाईल. प्राथमिक निवड झाल्यानंतर उमेदवारांकडून आवश्यक हमीपत्र घेण्यात येईल आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्रातील विभागनिहाय जागा
अहिल्यानगर ६४, अकोला ४८, अमरावती ७८, छत्रपती संभाजीनगर ७८, बीड ५१, बारामती ५६, भुसावळ २९, बुलढाणा ४४, चंद्रपूर ६०, चिपळूण ८१, गडचिरोली ५०, धुळे १०५, गोवा १३०, जळगाव ३८, कोल्हापूर १०७, कराड ५९, लातूर १९, मालेगाव ५७, नागपूर शहर ८, नागपूर ग्रामीण ११९, नांदेड ५५, नाशिक ३५, नवी मुंबई ३८, धाराशिव १५, पालघर ५३, परभणी ५२, पुणे ग्रामीण ९४, रायगड १०१, सातारा ७६, श्रीरामपूर ५९, ठाणे ५०, वर्धा ३८, यवतमाळ ६६, रत्नागिरी ६५, सांगली १००, पुणे शहर पश्चिम १५, पुणे शहर पूर्व ३१, पंढरपूर ५५, RMS BM DN मिरज ७, RMS DN पुणे १, सिंधुदुर्ग ७६, सोलापूर ४९, मुंबई शहर उत्तर-पश्चिम १२, मुंबई उत्तर २, मुंबई उत्तर-पूर्व ३, मुंबई दक्षिण १ आणि मुंबई पश्चिम १ अशी विभागनिहाय पदे आहेत.
अर्जाची अंतिम मुदत २१ सप्टेंबर
ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. खुल्या प्रवर्गातील, इमाव आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. महिला, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि विभागनिहाय रिक्त पदांची माहिती तपासूनच अर्ज करावा.
ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ : India Post GDS Online Engagement

