बीड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. 29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून, बुधवारी सकाळपासून त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये उपचार देण्याची सूचना वैद्यकीय पथकाने केली आहे. मात्र, उपोषणावर ठाम असलेल्या जरांगे यांनी सलाईन आणि औषधोपचार घेण्यास नकार दिल्याने मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या या प्रवासादरम्यान बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्काम करण्यात आला. रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली विशेष वैद्यकीय पथक पहाटे सुमारे तीन वाजता त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.
वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने सलाईन, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी आपले मुंबई आंदोलन थांबवण्याची भूमिका घेतलेली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील प्रवासाबाबत आणि प्रकृतीबाबत मराठा समाजामध्ये चिंता वाढली आहे.
दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांकडून त्यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता तिसऱ्यांदा केलेल्या अर्जावर पोलिसांनी त्यांना पत्र दिले असून, अर्जातील माहिती आणि जरांगे यांनी केलेल्या काही वक्तव्यांमध्ये विरोधाभास असल्याचे पोलिसांनी नमूद केल्याची माहिती आहे.
त्यामुळे एकीकडे प्रकृती खालावत असताना दुसरीकडे मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न कायम आहे. डॉक्टरांनी तातडीने उपचार आणि आयसीयूमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला असतानाही जरांगे उपचार घेण्यास तयार नसल्याने त्यांच्या पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे आता वैद्यकीय यंत्रणेसह मराठा आंदोलकांचे लक्ष लागले आहे.

