सांगली प्रतिनिधी
सांगली : गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा उत्साह सुरू असतानाच माधवनगर परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. जुन्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान हत्येत झाले. विशेष म्हणजे, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेत बसवराज कल्लापा आडकाई याचा मृत्यू झाला. तो कुपवाड परिसरातील अहिल्यानगर येथे राहत असल्याची माहिती आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बसवराज आडकाई याचा काही मित्रांसोबत वाद झाला होता. त्यानंतर गणेश आगमनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास तो मित्रांसोबत माधवनगर येथील कॉटन मिल परिसरात आला होता. यावेळी जुन्या वादाचा विषय पुन्हा उफाळून आला आणि त्यांच्यात वाद झाला.
वाद वाढल्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्राने बसवराज आडकाई याच्या छातीवर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह संजयनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संजीव झाडे यांनीही तपासाची सूत्रे हाती घेतली.
प्राथमिक तपासात जुन्या वादातूनच हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयितांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर माधवनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

