सातारा प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मेढा येथेच राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे थेट इशारा दिल्याने सातारा-जावळीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मेढा येथे दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजेंनी केलेल्या वक्तव्याने आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला नवी धार मिळाली आहे.
“जंगल शांत आहे म्हणजे जंगलात वाघ नाही, असे समजू नका. वाघ झोपलेला असेल. त्यामुळे जपून राहा. डिवचायचे, काड्या घालण्याचे काम करू नका; अन्यथा तुम्हाला परवडणार नाही,” असा सूचक मात्र आक्रमक इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. शिवेंद्रराजेंनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख शशिकांत शिंदे यांच्याकडेच असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी आणि राजकीय वर्तुळात रंगली.
जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप समर्थक गटांमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि ठरावांच्या निमित्ताने संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची तीव्रता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढली आहे. सोसायटी मतदारसंघातील ठराव प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांमध्ये झालेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले होते.
आखाडे येथील सोसायटीच्या ठरावाच्या वेळी दोन्ही गट आमनेसामने आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व असलेल्या या सोसायटीतील सदस्यांना सहलीला नेणे, फोडाफोडीचे प्रयत्न करणे, तसेच ठराव आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर अवघ्या एका मताच्या फरकाने शिवेंद्रराजे समर्थकाच्या नावाचा ठराव मंजूर झाला. या घटनेने जावळीतील राजकारण ढवळून निघाले.
मात्र, त्यानंतर हातगेघर सोसायटीच्या ठरावावेळी राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. शिवेंद्रराजे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचे वर्चस्व असलेल्या या सोसायटीची ठराव प्रक्रिया घेण्यात येणार होती. मात्र, आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने बैठकच रद्द झाली. त्यामुळे भाजप समर्थक गटाला धक्का बसला.
या घटनेनंतर वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्या गटावर गंभीर आरोप केले. सोसायटीचे संचालक ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप करत मानकुमरे थेट शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. “संचालक मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही,” अशी भूमिका घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
आखाडे सोसायटीतील घडामोडींना हातगेघरच्या माध्यमातून उत्तर देण्यात आल्याचा आरोप भाजप समर्थकांकडून करण्यात आला. त्यानंतर शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला. सहकारी संस्थांच्या निवडणुकांपासून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत पोहोचल्याने सातारा-जावळीच्या राजकारणात या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर मेढा येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात शिवेंद्रराजेंनी केलेले वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. शशिकांत शिंदे यांच्याच प्रभावक्षेत्रात जाऊन शिवेंद्रराजेंनी “वाघ” आणि “जंगल” या शब्दांचा वापर करत दिलेला इशारा हा आगामी राजकीय संघर्षाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष सातारा-जावळी मतदारसंघापुरता मर्यादित राहिलेला नाही. सहकार क्षेत्रातील वर्चस्व, स्थानिक संस्थांवरील पकड आणि जिल्हा बँकेतील समीकरणे यामुळे दोन्ही गटांमधील संघर्षाला व्यापक राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सोसायट्यांच्या ठरावांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक घडामोडीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यावर शशिकांत शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्याकडून या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले जाते का, की राजकीय संघर्ष आणखी तीव्र होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मेढ्यातील दहीहंडीचा उत्सव संपला असला तरी “जंगलातील वाघ” या शिवेंद्रराजेंच्या एका वक्तव्याने सातारा-जावळीच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.

