सातारा प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘प्रतीक थोरात देशभक्त Gen Z’, ‘सोनाली देशमुख’, ‘हरी शिंदे’ आणि ‘माणदेश-प्राइम-न्यूज’ या फेसबुक व यूट्यूब अकाउंटधारकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमर बाळासाहेब मोकाशी (वय ५०, रा. कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘राजधानी सातारा दहीहंडी उत्सव २०२६’ कार्यक्रमातील मंत्री भोसले यांच्या मूळ छायाचित्रात डिजिटल पद्धतीने फेरफार करून अश्लील व विभत्स स्वरूपाचा बनावट फोटो तयार करण्यात आला. हा फोटो AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बनावट छायाचित्रासोबत भावना दुखावणारा आणि दिशाभूल करणारा मजकूर जोडून तो फेसबुक व यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. लोकप्रतिनिधीची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या तसेच समाजात द्वेष निर्माण होईल, अशा उद्देशाने संबंधित पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५३(२), ३५६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन गणपतराव म्हात्रे करीत आहेत.

