सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात पती-पत्नीने विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. संजय तात्यासो पाटील (४६) आणि मनीषा संजय पाटील (४२) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दाम्पत्याने २ सप्टेंबर रोजी विषारी पदार्थ प्राशन केल्याची माहिती आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना प्रथम पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोघांनाही घरी जाण्याची परवानगी दिली होती.
मात्र, घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांची प्रकृती पुन्हा खालावली. रविवारी सकाळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी दोघांनाही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू
मिरज शासकीय रुग्णालयात सकाळी सुमारे ११ वाजता मनीषा पाटील आणि संजय पाटील यांना दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी मनीषा पाटील यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी सुमारे चार वाजता त्यांचाही मृत्यू झाला.
एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कर्जाच्या तगाद्याची परिसरात चर्चा
दरम्यान, दाम्पत्याने कर्जाच्या तगाद्याला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा पलूस परिसरात आहे. मात्र, या चर्चेला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे विषप्राशन करण्यामागील नेमके कारण काय, याबाबत पोलिस तपासातूनच स्पष्टता येणार आहे. पोलिसांकडून कुटुंबीय तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले जाण्याची शक्यता आहे.
पलूसमध्ये सलग दुसरी घटना
पलूस शहरात पती-पत्नीच्या विषप्राशनानंतर मृत्यूची ही काही दिवसांतील दुसरी घटना असल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी बाळासाहेब मुरलीधर कदम (५८) आणि त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (४६) यांच्या मृत्यूची घटना घडली होती.
बाळासाहेब कदम यांचा ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. तर उषा कदम यांच्यावर उपचार सुरू असताना १ सप्टेंबर रोजी सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. प्राथमिक तपासात घरगुती कारणाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी या घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे पलूस परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी जनजागृतीची गरज आहे.

