जालना, प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे. उपोषणाचा दहावा दिवस सुरू असताना १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यभरातील मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या बैठकीनंतर मुंबईकडे कूच करण्याची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या अंतरवाली सराटी येथे अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. ‘आता कोणीही इकडे गर्दी करू नका. १२ तारखेला सर्व मराठा बांधवांनी अंतरवालीत बैठकीसाठी यायचे आहे. त्या दिवशी पुढील दिशा ठरवू आणि मुंबईकडे कधी निघायचे, याचा निर्णय घेऊ,’ असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
१२ सप्टेंबरची बैठक निर्णायक ठरण्याचे संकेत देत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाजाला अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबईसह नागपूर, कोल्हापूर, नांदेड, सांगली, सातारा, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील मराठा बांधवांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले.
‘१२ तारखेला कोणतीही कुचराई करू नका. दहा लोक असोत, ५० असोत, पाच हजार असोत किंवा पाच लाख असोत; प्रत्येकाने अंतरवालीत प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे. घरात बसून बैठक ऐकू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येणार असून ध्वनिक्षेपक, एलईडी स्क्रीन तसेच नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना जरांगे पाटील यांनी सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजातील रोष वाढत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मुंबईकडे आंदोलन घेऊन जाताना पोलिसांकडून आंदोलकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पोलिसांशी संघर्ष न करण्याचे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले. ‘पोलिसांचा दोष नाही. आमचा संघर्ष सरकारशी आहे. पोलिसांनी कितीही त्रास दिला तरी पोलिसांना त्रास देऊ नका. त्यांना स्पष्ट सांगा की आमचे भांडण सरकारशी आहे, तुमच्याशी नाही,’ असे ते म्हणाले.
मुंबईकडे जाताना आंदोलकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. ‘मुंबईकडे जाताना एखाद्या मराठ्याच्या डोक्यातून रक्त निघाले तर दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे,’ असे जरांगे पाटील म्हणाले. पोलिसांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलकांनी घाबरून पळू नये, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईकडे जाण्याची तारीख निश्चित होण्यापूर्वीच कोणीही मुंबईकडे जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मुंबईला आताच जाऊ नका. १२ तारखेला अंतरवालीत बैठक होऊ द्या. त्यानंतर मुंबईकडे जाण्याची तारीख ठरेल आणि त्या तारखेला आपण सर्वजण निघू,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे होणारी बैठक मराठा आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. मुंबईकडे कूच करण्याची नेमकी तारीख काय ठरते आणि सरकार त्यापूर्वी कोणती भूमिका घेते, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

