ठाणे प्रतिनिधी
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडत नवे वळण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महापुरुषांच्या प्रतिमांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो असता कामा नये; मात्र सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायलाच हवा, तो स्वतंत्र ठिकाणी असावा, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात मांडली. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या कृतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पुण्यातील फोटो प्रकरणावर प्रथमच सविस्तर भाष्य केले. सण-उत्सव, धर्म, सामाजिक वातावरण आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
नेमकं पुण्यात काय घडलं?
मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे पुण्यातील गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाहणी व विद्यार्थ्यांशी संवादासाठी गेले होते. यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आणि पंतप्रधानांची प्रतिमा तेथून हटविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींची प्रतिमा खाली उतरवली.
या घटनेनंतर पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयाच्या कार्यालयात विनापरवानगी प्रवेश, घोषणाबाजी, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि पंतप्रधानांची प्रतिमा हटविणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणात तीन मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली होती.
या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले. मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये माटुंगा परिसरात वाद झाला. दरम्यान, भाजपकडून अमित ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीतील मनसेसोबतची युती तोडण्याची मागणीही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला केवळ फोटो काढण्याच्या घटनेपुरते मर्यादित न राहता व्यापक राजकीय स्वरूप प्राप्त झाले.
‘त्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको’
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाण्यातील मेळाव्यात अमित ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रांगेत कोणी बसू शकत नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने सरकारी कार्यालयात त्यांचा फोटो असायलाच हवा, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र तो महापुरुषांच्या प्रतिमांच्या रांगेत नको, तर दुसऱ्या भिंतीवर स्वतंत्रपणे असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला पाहिजे. कारण पंतप्रधान आहेत. बाकी मतभेद शंभर असतील. पण तो दुसऱ्या भिंतीवर… त्या रांगेत नको,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारी कार्यालये, शाळा आणि इतर शासकीय आस्थापनांनी प्रतिमा लावताना ही बाब पाळली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपामागील मूलभूत भूमिकेला राज ठाकरेंनी समर्थन दिल्याचे दिसून आले.
‘धर्माभिमानी व्हा, धर्मांध नव्हे’
या प्रकरणाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावरही भाष्य केले. देशभरात धर्माची “झिंग” निर्माण केली जात असल्याचे सांगत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात राग आणि तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप केला.
“धर्माचा अभिमान समजू शकतो; पण धर्माची झिंग नको. धर्माभिमानी असले पाहिजे, धर्मांध नव्हे,” असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक काही मुद्दे पुढे करून लोकांचे लक्ष अन्य महत्त्वाच्या प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
‘तुम्हाला वेगळ्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न’
राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आगामी काळातील राजकीय आव्हानांबाबत सावध केले. काही घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत आणि त्यातून मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष इतर महत्त्वाच्या प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
त्यामुळे पुण्यातील फोटो प्रकरणावरून भाजप आणि मनसेमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाला राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे नवे राजकीय परिमाण मिळण्याची शक्यता आहे. एका बाजूला पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात असण्याची आवश्यकता मान्य करतानाच, दुसऱ्या बाजूला तो महापुरुषांच्या प्रतिमांसोबत लावण्यास विरोध अशी राज ठाकरेंची भूमिका आहे.
पुण्यातील घटनेनंतर अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना आता पक्षाध्यक्षांनीच त्यांच्या भूमिकेची पाठराखण केल्याने या वादाकडे आगामी राजकीय संघर्षाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

