पुणे प्रतिनिधी
पुणे : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडी, रस्त्यांवरील खड्डे, रखडलेले मेट्रोचे काम तसेच फुटपाथ, कचरा, पिण्याचे पाणी, सांडपाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी आयटीयन्ससह हिंजवडीकरांनी मूक मोर्चा काढला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या मोर्चात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
मोर्चामध्ये सुरुवातीला सुमारे ५०० महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि आयटीयन्स सहभागी झाले. फेज वन येथील इन्फोसिस सर्कल येथे मोर्चाची सांगता झाली. आदित्य ठाकरे तेथे पोहोचताच आंदोलकांनी त्यांच्या भोवती गर्दी करून विविध समस्या मांडल्या. सोसायटीधारक, आयटीयन्स तसेच स्थानिक ग्रामस्थांनी वाहतूककोंडी, खड्डे, रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नांवर सरकारदरबारी आवाज उठविण्याची ग्वाही दिली. खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूककोंडी आणि पायाभूत सुविधांची कमतरता याला कंटाळून हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक कर भरत असतानाही त्यांना चांगले रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.
हिंजवडीसारख्या महत्त्वाच्या आयटी पार्कमध्ये रस्ते, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागते, ही खेदाची बाब असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हिंजवडी मेट्रोचे काम पूर्ण झाले असतानाही केवळ उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे सेवा रखडविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविल्यास हे प्रश्न आठवडाभरात मार्गी लागू शकतात. मेट्रो सुरू करण्यासाठी केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा न करता नागरिकांच्या सोयीसाठी सेवा लवकर सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुणेकरांनी डीजेविरोधात काढलेल्या मोर्चाबाबतही आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन स्थानिक नागरिकांचा आवाज ऐकणे आवश्यक आहे. एका मतदारसंघात डीजेला परवानगी असताना दुसरीकडे त्यावर पोलिसांकडून बंदी घातली जाते, अशी विसंगती दूर करून राज्य सरकारने सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या मोर्चात शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन पडवळ, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, रामदास धनवटे, पुणे शहरप्रमुख वसंत मोरे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि आयटीयन्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.

