पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवातील डीजे, लाऊडस्पीकरचा कर्णकर्कश आवाज आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर भररस्त्यात झालेल्या मारहाणीने पुण्यात खळबळ उडाली आहे. टिळक रस्त्यावरील कशाळे चौक परिसरात बापट हे एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना संतोष चव्हाण नामक तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मात्र, या हल्ल्यानंतरही बापट यांनी आपली भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “माझ्यावर मारहाण केल्याने माझा निश्चय ढळणार नाही. माझ्या मुद्द्यांना मुद्द्याने उत्तर देता येत नाही, म्हणून हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी हल्लेखोरांवर टीका केली.
‘मला प्रसिद्धी नको, प्रश्न महत्त्वाचा’
हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना बापट यांनी आपण कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा विशिष्ट समाजाविरोधात भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे.
“मला स्वतःचे व्यक्तिमत्त्व मोठे करायचे नाही किंवा प्रसिद्धी मिळवायची नाही. तुम्हाला खरोखर समाजहित करायचे असेल तर मी मांडलेले कायदेशीर मुद्दे पुढे न्या. माझ्या मुद्द्यांना तार्किक उत्तर नसेल तर अशा प्रकारे मारहाण करून प्रश्न सुटणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
बापट यांच्या मते, त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले किंवा घोषणाबाजी झाली तरी त्याने आपण विचलित होणार नाही. ‘बापट विरुद्ध पुणेकर’ असा हा संघर्ष नसून नागरिकांच्या शांततेच्या आणि आरोग्याच्या हक्काचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘उत्सवाला विरोध नाही; ध्वनीप्रदूषणाला विरोध’
गणेशोत्सवाच्या स्वरूपावरही बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून, उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनीप्रदूषण करणे आणि रस्ते अडविणे याला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
“तुम्हाला उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करायचा असेल तर करा; मात्र त्यामुळे भीषण ध्वनीप्रदूषण होता कामा नये आणि वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होता कामा नये. नागरिकांवर ध्वनीप्रदूषण जबरदस्तीने लादणे योग्य नाही,” असे बापट यांनी म्हटले.
“पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो. मग मारहाण करणे आणि धुडगूस घालणे हीच आपली संस्कृती आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने देता येत नाही’
बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाला आता हिंसक वळण मिळाल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. बापट यांनीही हल्लेखोरांना उद्देशून विचारांना विचारांनी उत्तर द्यावे, असा स्पष्ट संदेश दिला.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संतोष चव्हाणला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, गणेशोत्सव आणि डीजेबाबत बापट यांच्या भूमिकेचा राग असल्याचे समोर आले आहे. मात्र, हल्ल्यामागे आणखी कोणी आहे का, यासह अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून हल्ल्याचा निषेध
या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. मत मांडल्याबद्दल मारहाण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.
गणेशोत्सव अधिकाधिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
दरम्यान, बापट यांच्या समर्थनार्थ नागरिकांनीही पुढाकार घेतला असून, डीजेमुक्तीसाठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बालगंधर्व चौक परिसरातून हा मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
‘उद्या माझे काय होईल सांगता येत नाही; पण जिवंत असेन तर नागरिकांच्या मोर्चात जाईन’
हल्ल्यानंतरही बापट यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी आपल्या सुरक्षेबाबतही भाष्य केले.
“उद्या माझे काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी जिवंत असेन तर नागरिकांच्या मोर्चाला नक्की जाईन,” असे बापट यांनी म्हटले.
ध्वनीप्रदूषणाविरोधातील लढ्याला अधिक व्यापक आणि संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी स्वतंत्र संघटना स्थापन करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
हल्ल्यानंतरही संघर्ष कायम
गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांत पुण्यात चांगलाच तापला आहे. बापट यांनी पुणे महापालिकेच्या बैठकीतही डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या भूमिकेला विरोध करणारे आणि समर्थन करणारे असे दोन्ही गट शहरात सक्रिय झाले आहेत.
आता बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हा वाद केवळ डीजे किंवा उत्सवाच्या स्वरूपापुरता मर्यादित न राहता अभिव्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकांचा शांततेचा अधिकार आणि कायद्याचे राज्य या व्यापक मुद्द्यांपर्यंत पोहोचला आहे.
“मारहाण झाली म्हणून माझी भूमिका बदलणार नाही. नागरिकांच्या शांततेसाठी आणि कायद्याच्या राज्यासाठी हा वैचारिक लढा सुरूच राहील,” असा निर्धार विद्यानंद बापट यांनी व्यक्त केला आहे.

