पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य सर्व सण-उत्सवांसाठी ध्वनीविषयक नियम समान राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गणेशोत्सवातील डीजेसाठी चार बेस आणि चार टॉप या मर्यादेचे पालन करावे लागेल. निर्धारित ध्वनीमर्यादा ओलांडून अधिक ध्वनियंत्रणा वापरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पोलिस अधिकारी आणि महापालिका प्रशासनाची बैठक गणेश कला क्रीडा मंच येथे झाली. या बैठकीत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग, बंद पथदिवे, स्वच्छतागृहांची कमतरता, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिवर्धकांना परवानगी आणि पोलिसांकडून होणाऱ्या कथित गैरवर्तनासह विविध प्रश्न मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
‘९९ टक्के मंडळे नियमांचे पालन करतात’
गणेश मंडळांचे बहुतांश कार्यकर्ते पोलिस प्रशासनाची भूमिका समजून घेतात. शहरातील सुमारे ९९ टक्के मंडळे आणि कार्यकर्ते बैठकीत ठरलेल्या नियमांचे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करतात. मात्र काही जण त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतात. अशा परिस्थितीत नियम मोडल्यास गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, असे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
‘पोलिस दल आपलेच आहे. आम्हीही गणेशभक्त आहोत. मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संघर्ष करण्याची पोलिसांची भूमिका नाही. अडचणी असतील तर पोलिसांकडून शक्य ते सहकार्य केले जाईल. मात्र नियम सर्वांसाठी समान असतील,’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘डीजेवरच कारवाई का?’
बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या ध्वनीमर्यादेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. टिळक रस्त्यावरून सुमारे २२५ गणेश मंडळांच्या मिरवणुका जातात. स्वारगेट चौकात चारही बाजूंनी मंडळे येत असल्याने या परिसरात विशेष वाहतूक आणि गर्दी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांची संख्या मोठी असते. एकाचवेळी सुमारे चार हजार ढोल वाजत असताना मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे ध्वनीमर्यादा ओलांडली जात असेल तर केवळ डीजेबाबतच नियमांची कठोर अंमलबजावणी का केली जाते, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
गेल्या वर्षी मिरवणूक उशिरापर्यंत; यंदा नियोजनावर भर
गेल्या वर्षी मानाच्या गणपतींची मिरवणूक शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र मिरवणूक अपेक्षेपेक्षा सुमारे दीड ते दोन तास उशिरापर्यंत सुरू राहिली. तरीही गर्दीचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठी दुर्घटना किंवा चेंगराचेंगरी झाली नाही. यंदा झालेल्या चर्चेमुळे प्रशासन आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक संवेदनशीलता निर्माण झाली असून मिरवणुकीच्या नियोजनातील सुधारणा यंदा पुणेकरांना दिसतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
रस्त्यांवरील खड्डे, बेवारस वाहनांचा प्रश्न ऐरणीवर
गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. शहरातील तीन हजारांहून अधिक बेवारस वाहने उत्सव काळात वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने ती तातडीने हटवावीत, अशीही मागणी करण्यात आली.
बंद पथदिवे दुरुस्त करावेत, महिला आणि पुरुषांसाठी पुरेशा संख्येने स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली. लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील बेकायदा पार्किंग हटवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
लक्ष्मी रस्त्याप्रमाणे टिळक रस्त्यालाही प्राधान्य द्या
लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीप्रमाणे टिळक रस्त्यावरील गणेश मंडळांच्या मिरवणुकीचेही महापालिकेने विशेष स्वागत आणि नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. स्वारगेट परिसरात चारही दिशांनी मंडळे येत असल्याने या ठिकाणी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
अश्लील गाणी, आक्षेपार्ह सादरीकरणाला परवानगी नाही
गणेशोत्सव किंवा दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी, आक्षेपार्ह सादरीकरण अथवा सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या प्रकारांना परवानगी दिली जाणार नाही, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. उत्सवाच्या काळात महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, पथारी व्यावसायिकांच्या व्यवस्थेचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सवाच्या काळात गणेश मंडळांची माहिती, वाहतुकीतील बदल आणि एकेरी मार्गांची माहिती देणारे फलक शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पोलिस आयुक्तांच्या प्रमुख सूचना
– प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी.
– मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक आणि सुरक्षेचे धोरण निश्चित करावे.
– मिरवणुकीचे पास किमान आठवडाभर आधी उपलब्ध करून द्यावेत.
– मिरवणुकीच्या दोन्ही दिवसांची परवानगी ग्राह्य धरावी.
– रस्त्यांवर खड्डे असल्यास पोलिसांनी पुढाकार घेऊन महापालिकेकडून ते बुजवून घ्यावेत.
– लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मिरवणुकीचे विशेष नियोजन करावे.
– गणेशोत्सवाच्या काळात अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबवावी.
मंडळांच्या प्रमुख मागण्या
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आणि प्रशासनासमोर आठ प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवणे, पोलिसांकडून होणारी कथित ढकलाढकली व मारहाण थांबवणे, नियमांची सर्व मंडळांवर समान अंमलबजावणी करणे, बेवारस वाहने हटवणे, बंद पथदिवे सुरू करणे, पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, टिळक रस्त्यावरील मिरवणुकीचे स्वतंत्र नियोजन करणे आणि मिरवणुकीचे पास शेवटच्या क्षणी न देता काही दिवस आधी देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असून, मंडळे आणि प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास उत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडता येईल. त्यामुळे नियमांचे पालन करतानाच मंडळांच्या व्यावहारिक अडचणी सोडविण्यावरही पोलिस आणि महापालिका प्रशासनाने भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

