सातारा प्रतिनिधी
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली असून, सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 ऑगस्ट रोजी त्यांनी सायन स्थानक परिसरातील एका टॉवरवर गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना खाली उतरवून सीपीआर दिल्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. रुपनवार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून आपल्यावर होत असलेल्या कथित दबावाबाबत गंभीर आरोप केले होते. शस्त्र परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणातून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी एका माजी मंत्र्यांच्या पीएचे नाव त्यांनी घेतले होते. तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीली मदने यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते. या प्रकरणानंतर डॉ. मदने यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित सुसाईड नोटच्या छायाचित्रात डॉ. रुपनवार यांनी काही व्यक्तींची नावे लिहिल्याचे दिसत आहे. त्यामध्ये माजी मंत्र्यांचे पीए प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. बंदूक परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र घेण्याच्या कारणावरून वाद झाल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने आपल्याशी अरेरावी केली तसेच त्यांच्या बॉडीगार्डने कॉलर पकडून मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
डॉ. रुपनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचा उल्लेख केला होता. याच रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणातही राजकीय हस्तक्षेप आणि मानसिक दबावाचे आरोप चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुग्णालयातील डॉक्टराने टोकाचे पाऊल उचलल्याने फलटणच्या वैद्यकीय व्यवस्थेतील कथित राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, डॉ. रुपनवार यांच्यावर प्रमाणपत्र देण्यास विलंब केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचा दावाही समोर आला आहे. 27 ऑगस्ट रोजी सायन स्थानक परिसरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

