सातारा प्रतिनिधी
साताऱ्याच्या औद्योगिक विकासाची ओळख बनलेल्या कूपर कॉर्पोरेशनने उत्पादन विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कंपनीच्या नव्या विस्तार प्रकल्पामुळे सातारा परिसरातील ३०० हून अधिक स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रस्तावित विस्ताराच्या जागेतून गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला विलंब होत आहे. महावितरण आणि महापारेषणकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्यावर तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
साताऱ्याच्या औद्योगिक नकाशावर शतकाहून अधिक काळ ठसा उमटविणाऱ्या कूपर कॉर्पोरेशनचा हा विस्तार केवळ कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणारा नसून स्थानिक रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. इंजिनसाठी आवश्यक असलेल्या विविध सुट्या भागांच्या निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणे हा या विस्तारामागील प्रमुख उद्देश आहे.
कूपर कॉर्पोरेशनच्या अधिकृत माहितीनुसार, कंपनीची मुळे साताऱ्यात शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी रुजली. आज कंपनी इंजिन कॉम्पोनंट्स, इंजिन, जनरेटर आणि ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रात कार्यरत असून तिची साताऱ्यात १३ अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीच्या उत्पादनांची निर्यात ४० हून अधिक देशांमध्ये केली जाते. एकूण उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के उत्पादन निर्यात केले जाते.
इंजिन सुट्या भागांची क्षमता वाढणार
प्रस्तावित विस्ताराचा केंद्रबिंदू इंजिनसाठी लागणाऱ्या विविध सुट्या भागांचे उत्पादन आहे. वाढत्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मागणीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन क्षमता वाढविणे कंपनीसाठी आवश्यक ठरत आहे. कूपरकडे क्रॅंकशाफ्ट, सिलिंडर लाइनर्स, सिलिंडर हेड्स, ब्लॉक्स यांसह विविध इंजिन घटकांच्या निर्मितीची सुविधा आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक मशिनरी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर केला जातो.
यापूर्वीही कूपरने साताऱ्यात उत्पादन क्षमतेच्या विस्तारासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. २०२४ मध्ये कंपनीने साताऱ्यात दोन अत्याधुनिक उत्पादन युनिट्सचा विस्तार केला होता. त्यापैकी एका युनिटमध्ये फाउंड्री क्षमता वाढविण्यात आली होती. त्या विस्तारामुळे २५० हून अधिक कुशल मनुष्यबळाला रोजगार मिळण्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती.
वीजवाहिन्यांचा अडथळा
दरम्यान, सध्याच्या प्रस्तावित विस्तारासाठी नवीन एमआयडीसीतील कूपर कॉर्पोरेशनच्या इंजिन विभागातील एम-६०/१ हा प्लॉट निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या जागेतून ३३ केव्ही आणि २२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्या जात असल्याने बांधकामास अडथळा निर्माण झाला आहे.
सुरक्षेच्या नियमांनुसार उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या खाली बांधकाम करणे शक्य नसल्याने या वाहिन्या प्लॉटच्या सीमारेषेकडे स्थलांतरित करणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरण आणि महापारेषणकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. वीजवाहिन्यांचे स्थलांतर झाल्यानंतरच प्रस्तावित जागा पूर्णपणे उपलब्ध होऊन बांधकामाला गती मिळू शकणार आहे.
त्यामुळे संबंधित विभागांनी या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतल्यास विस्तार प्रकल्पाच्या कामाला वेग येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीही लवकर उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साताऱ्याच्या अर्थचक्राला चालना
कूपर कॉर्पोरेशनचा विस्तार हा केवळ एका उद्योगाचा विस्तार न राहता साताऱ्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. नव्या रोजगारांबरोबरच वाहतूक, कंत्राटी सेवा, देखभाल-दुरुस्ती, पुरवठा साखळी आणि अन्य पूरक व्यवसायांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या संकेतस्थळानुसार कूपरमध्ये सातारा परिसरातील तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि स्थानिक प्रतिभेला रोजगार देण्यावर कंपनीचा विशेष भर आहे. त्यामुळे प्रस्तावित विस्तारातून आणखी ३०० हून अधिक स्थानिक युवकांना संधी मिळण्याची शक्यता साताऱ्यातील रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
कूपरच्या उत्पादनांना परदेशी बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. कंपनी ४० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते आणि आतापर्यंतच्या निर्यातीचे मूल्य १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील उत्पादन क्षमतेचा विस्तार हा स्थानिक उद्योगविश्वासाठी आश्वासक संकेत मानला जात आहे. मात्र, प्रकल्पाच्या मार्गातील प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
“साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण होत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,” असे कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. नितीन देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, कूपरच्या साताऱ्यातील आणखी एका विस्तार प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रक्रियाही यापूर्वी पार पडली आहे. अतिरिक्त एमआयडीसी, कोडोली येथील के-१० प्रकल्पात सिलिंडर लाइनर्सच्या सीआय/एसजी आयर्न कास्टिंगची क्षमता २,४५० मेट्रिक टन प्रतिमहिन्यावरून ५,६३३ मेट्रिक टन प्रतिमहिन्यापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर ठेवण्यात आला होता. या प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती.
त्यामुळे साताऱ्यातील कूपर कॉर्पोरेशनचा विस्तार हा उद्योग, निर्यात आणि रोजगार या तिन्ही आघाड्यांवर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. आता उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न किती जलदगतीने मार्गी लागतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष विस्तारीकरणाला किती वेग मिळतो, याकडे साताऱ्यातील उद्योग क्षेत्रासह रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे लक्ष लागले आहे.

