अमरावती प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) ही दुर्घटना घडली. व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनेच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील एसएनसीयू विभागात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर विभागात एकच गोंधळ उडाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत इतर नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. मात्र, या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एसएनसीयू विभागात कमी दिवसांचे, कमी वजनाचे तसेच गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आगीनंतर काही बालकांना पुढील उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून, अन्य तीन बालक किरकोळ भाजले आहेत. काही बालकांना पीडीएमसी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.
व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची चर्चा असली तरी, शॉर्टसर्किटची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त होत असून, रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

