स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईच्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे आणि माहिम रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून एका ६२ वर्षीय प्रवाशाला खाली ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे ट्रॅकजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॅझेटन डेनिस पेरिस असं मृत प्रवाशाचं नाव आहे. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद सफरुद्दीन शेख याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी चर्चगेटहून बोरीवलीच्या दिशेने जाणारी धीमी लोकल वांद्रे रेल्वे स्थानकाकडे येत होती. दुपारी सुमारे १.२४ ते १.२७ वाजण्याच्या दरम्यान लोकल वांद्रे स्थानकात दाखल झाली. त्यावेळी लोकलमधील काही प्रवाशांनी एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. संबंधित व्यक्तीने धावत्या लोकलमधून एका प्रवाशाला खाली ढकलल्याचं प्रवाशांनी पोलिसांना सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वांद्रे आणि माहिम स्थानकांदरम्यान वांद्रे खाडीच्या परिसरात एक व्यक्ती गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी जखमी प्रवाशाला तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
मृत प्रवाशाची ओळख कॅझेटन डेनिस पेरिस अशी झाली. त्यांचं वय ६२ वर्षे होतं. पेरिस हे दिव्यांग होते. काही वर्षांपूर्वी प्लंबिंगचं काम करत असताना झालेल्या अपघातात त्यांचा एक पाय गमावला होता. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ते यापूर्वी सांताक्रूझ परिसरात राहत होते. मात्र, सध्या ते कुटुंबासोबत राहत नव्हते. त्यांचं लग्नही झालं नव्हतं.
बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचा संशय
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमजद सफरुद्दीन शेखची चौकशी सुरू केली आहे. अमजद हा चर्चगेट पूर्वेकडील एका दर्ग्याजवळील फुटपाथवर राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून अमजद आणि कॅझेटन पेरिस यांच्यात वाद झाला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या वादातूनच अमजदने पेरिस यांना धावत्या लोकलमधून धक्का दिल्याचा आरोप आहे. मात्र, चौकशीदरम्यान अमजदने पोलिसांना वेगळंच कारण सांगितल्याची माहिती आहे.
‘डब्यात कावळा शिरला होता’… आरोपीचा अजब दावा
लोकलमधून प्रवाशाला खाली का ढकललं, असा सवाल पोलिसांनी अमजदला केला असता त्याने लोकलच्या डब्यात कावळा शिरल्याचं सांगितलं. कावळ्याला डब्याबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करत असताना पेरिस यांना धक्का लागला आणि ते धावत्या ट्रेनमधून खाली पडले, असा दावा अमजदने केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
मात्र, पोलिसांना अमजदचा हा दावा संशयास्पद वाटत असून घटनेमागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास सुरू आहे. बसण्याच्या जागेवरून झालेला वाद आणि त्यानंतर झालेला कथित धक्का याबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. त्यामुळे ही घटना खरंच अपघात होती की जाणूनबुजून प्रवाशाला खाली ढकलण्यात आलं, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रवाशांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं
वांद्रे स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर काही प्रवाशांनी अमजद शेखला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशाचा शोध घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहजी निकम यांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १.२७ वाजता ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली होती. त्यावेळी प्रवाशांनी एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देत त्याने धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला धक्का दिल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान पेरिस यांचा मृत्यू झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद सफरुद्दीन शेख याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा नेमका क्रम, आरोपी आणि मृत प्रवाशामध्ये झालेला वाद, धक्का नेमका कशामुळे बसला आणि आरोपीने सांगितलेल्या कावळ्याच्या कारणामागे कितपत तथ्य आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे मुंबईच्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गर्दीच्या लोकलमध्ये किरकोळ वादाचं रूपांतर गंभीर घटनेत होऊ शकतं, हे या घटनेतून समोर आलं आहे. विशेष म्हणजे मृत पेरिस हे एका पायाने दिव्यांग असल्याने धावत्या लोकलमध्ये त्यांच्यासोबत घडलेला हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.

