सातारा प्रतिनिधी
सातारा : माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दिलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशातून राज्यात जलसंधारणाची चळवळ उभी राहिली. त्यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मृदसंधारण, जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यावर या उपक्रमांतून भर दिला जाणार आहे.
१५ ते २९ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
राजवाडा ते शिवतीर्थ ‘महा वॉकाथॉन’
जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता राजवाडा ते शिवतीर्थ या मार्गावर ‘महा वॉकाथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आला आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे.
या वॉकाथॉनमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, NCC, NSS, माय भारत, नेहरू युवा केंद्र, स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब तसेच रनिंग व सायकलिंग क्लब आणि १५ वर्षांवरील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागींसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून, त्यांना ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट, कॅप आणि ‘मी जलदूत’ बॅज देण्यात येणार आहे. वॉकाथॉनमधील प्रथम पाच विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
युवकांसाठी ‘रील’ स्पर्धा
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण, शेततळी, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण यांसह विविध विषयांवर रील तयार करता येणार आहे.
रीलमध्ये Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals यांचा वापर करता येणार आहे. सोशल मीडियावर #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर तीन उत्कृष्ट विजेत्यांची ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
शाळा-महाविद्यालयांत स्पर्धा
१५ ऑगस्ट ते २६ जानेवारीदरम्यान शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला-पोस्टर आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ‘जलसंधारणाचे महत्त्व’, ‘पाण्याचे महत्त्व’, ‘जल है तो कल है’, ‘जलसंवर्धन उपाय’ आणि ‘घरातील पाण्याचा वापर–वॉटर बजेट’ या विषयांवर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
‘एक शाळा, एक शोषखड्डा’, विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती, ‘जलमित्र-जलदूत’ घोषित करणे, २१ ऑगस्ट रोजी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे तसेच मृद व जलसंधारणाची शपथ घेण्याचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांचा आणि विद्यार्थ्यांचा २६ जानेवारी रोजी गौरव करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून जलसंधारणाची कामे
जलसंधारण अभियानाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व जलपूजन, ‘कॅच द रेन’ अंतर्गत कामांची पाहणी, अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण, ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ आणि ‘एक पेड माँ के नाम’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लोकसहभागातून तलाव, नाले, विहिरी आणि पाझर तलाव स्वच्छता मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.
शेततळी, शेतबंधारे, CCT आणि Deep CCT यांची पाहणी करून छायाचित्रण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. माती आणि पाणी ही शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाची मूलभूत साधने असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आणि अभियंता अरुणकुमार दिलपाक उपस्थित होते.

