मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील ‘अ’ वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या उपअभियंत्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. राधेश्याम जैस्वाल असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराकडे संबंधित कामाच्या अनुषंगाने लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने सापळा रचला.
‘अ’ वॉर्ड कार्यालयाच्या परिसरात ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने जैस्वाल यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, जैस्वाल यांच्या घरासह कार्यालयातील संबंधित कागदपत्रे आणि फाइल्सची एसीबीकडून तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे लाचेची मागणी केली होती का, याचा तपासही करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यावर लाच स्वीकारताना झालेल्या या कारवाईमुळे पालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

