सांगली प्रतिनिधी
सांगली : शहरातील भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले, बंद पथदिवे, पावसामुळे खराब झालेले रस्ते, अपुरा पावसाळी मुरूम तसेच महापालिकेची उद्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांना देखभालीसाठी देण्याच्या प्रस्तावावरून गुरुवारी होणारी महापालिकेची महासभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरून बुधवारी झालेल्या पक्षीय बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, खड्डे आणि दलदलीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थायी समितीने आदेश देऊनही प्रभागांमध्ये पुरेसा पावसाळी मुरूम टाकला जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मुरूमाअभावी नागरिकांकडून जाब विचारला जात असून, प्रभागात फिरणेही अवघड झाल्याची व्यथा नगरसेवकांनी मांडली.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांचाही मुद्दा महासभेत उपस्थित होणार आहे. लहान मुले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महापालिका प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते का, असा सवाल नगरसेवकांकडून उपस्थित केला जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंद पथदिव्यांचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये पथदिवे बंद असून, कंपनी आणि महापालिका प्रशासनातील वादामुळे दुरुस्ती रखडल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या विषयावरूनही प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील जानेवारी २००६ ते २०१० या कालावधीतील महापालिका हिश्श्याची ५० टक्के रक्कम देण्यासाठी ४.३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर आहे. तसेच महापालिकेच्या मालकीची जागा आणि एमएसईबीकडील जागेची अदलाबदल करण्याचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे.
शहरातील विविध उद्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांना देखभालीसाठी देण्याचा प्रस्तावही महत्त्वाचा ठरणार आहे. उद्याने देताना कोणत्या अटी-शर्ती असतील, देखभालीचा दर्जा कसा राखला जाणार आणि नागरिकांना कोणत्या सुविधा मिळणार, याबाबत नगरसेवक प्रशासनाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
शामरावनगरमधील दफनभूमीची काही जागा क्रीडांगणासाठी देण्याचा ठराव यापूर्वी झाला आहे. या निर्णयाला विरोध करणारा प्रस्ताव फिरोज पठाण यांच्यासह काही नगरसेवकांनी आणला आहे. त्यामुळे या विषयावरही महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

