मुंबई प्रतिनिधी
मुंबई : पादचाऱ्यांसाठी पदपथ अडथळामुक्त करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत लालबाग परिसरात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. ‘एफ दक्षिण’ विभागाने केलेल्या या कारवाईत पदपथांवर अडथळा ठरणारी ६ अनधिकृत दुकाने, २४ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ३ अनधिकृत कट्टे आणि ४३ फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
लालबाग परिसरातील मानाचे गणपती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतच्या पदपथांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर परिसरातील पदपथांची स्वच्छताही करण्यात आली. यावेळी काळाचौकी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या नेतृत्वाखाली ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात लालबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली. पदपथांवर अनधिकृत बांधकामे, दुकाने किंवा साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

