सातारा प्रतिनिधी
जावळीच्या राजकारणात सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरून सुरू झालेला संघर्ष आता चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. सोसायट्यांच्या निवडणुका आणि ठरावांच्या निमित्ताने दोन राजकीय गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता थेट आरोप-प्रत्यारोप आणि आमनेसामनेच्या इशाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला थेट इशारा दिला आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय, दहशत किंवा दमदाटी झाली तर संघर्षाची आमची ११० टक्के तयारी आहे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
जावळी तालुक्यातील सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या गटातील कार्यकर्त्यांना फोडण्याचे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. आर. डी. वरोशीसह तीन सोसायट्यांमध्ये कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे प्रयत्न हाणून पाडण्यात यश आल्याचा दावाही त्यांनी केला.
आखाडे विकास सोसायटीच्या ठरावाच्या वेळीही वातावरण तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. ठरावांची प्रक्रिया सहकार क्षेत्रातील असली तरी त्यामागे राजकीय ताकद पणाला लागल्याचे चित्र जावळीत निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीचा ठराव हा आता केवळ सहकार क्षेत्रातील निर्णय न राहता दोन्ही राजकीय गटांच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार
कार्यकर्त्यांना दहशत, दमदाटी किंवा दादागिरीचा सामना करावा लागला तर आपण गप्प बसणार नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. प्रसंगी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ठरावाच्या प्रक्रियेनंतर एका कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. या घटनेवरून शशिकांत शिंदे गटावर निशाणा साधताना भोसले यांनी, कोण दहशत निर्माण करतो, कोण दडपशाही करतो आणि कोण दमदाटी करतो, हे आता जनतेसमोर स्पष्ट होत असल्याचा दावा केला.
‘लोकशाहीच्या गप्पा आणि प्रत्यक्षात वेगळे वर्तन’
लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात वेगळे वागायचे, हे आता चालणार नाही, असा घणाघातही शिवेंद्रसिंहराजेंनी केला. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र कार्यकर्त्यांवर दबाव आणणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
‘धाकधपटशाही दाखवली तर जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला किंवा त्यांना मारहाण झाली, तर संघर्ष करण्याची आमची ११० टक्के तयारी आहे,’ असा थेट इशाराच त्यांनी दिला.
जावळीच्या राजकारणात संघर्षाची नवी ठिणगी
शिवेंद्रसिंहराजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे जावळीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. आतापर्यंत सोसायट्यांच्या ठरावांपुरता मर्यादित असलेला वाद आता थेट दोन राजकीय गटांच्या शक्तिप्रदर्शनाकडे जाताना दिसत आहे. आगामी काळात आणखी काही सहकारी संस्थांचे ठराव होणार असल्याने या संघर्षाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी थेट संघर्षाची भाषा केली असताना दुसरीकडे शशिकांत शिंदे गटाची भूमिका काय राहणार, याकडे जावळीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात जावळीतील सहकारी संस्थांच्या राजकारणासोबतच तालुक्यातील राजकीय समीकरणांनाही या संघर्षाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जावळीतील सोसायट्यांच्या ठरावांचा हा वाद कुठपर्यंत जातो आणि दोन्ही गटांमधील हा संघर्ष निवडणुकीच्या राजकारणाला कोणते वळण देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

