मुंबई प्रतिनिधी
मुंबईत घर देताना मराठी-अमराठी, तसेच मांसाहार करणाऱ्या नागरिकांबाबत भेदभावाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दारात पोहोचला आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील आलिशान इमारतीतील फ्लॅटच्या जाहिरातीदरम्यान मांसाहारी व्यक्तींना घर दिले जाणार नसल्याचे सांगणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे याला मनसे नेते अमित ठाकरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. ‘तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो,’ अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी कावरे याला सुनावल्याने भेटीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी भावेश कावरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संबंधित घरासाठी मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. ‘व्हेजिटेरियन हो तो आ जाओ,’ या वक्तव्यामुळे मुंबईतील घरांच्या व्यवहारांमध्ये मांसाहारी नागरिकांबाबत केला जाणारा भेदभाव पुन्हा ऐरणीवर आला. विशेषतः मुंबईत मोठ्या संख्येने राहणाऱ्या मराठी माणसांच्या आहाराच्या सवयींवरून घर नाकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने या प्रकरणावर संताप व्यक्त करण्यात आला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग येथील भावेश कावरेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. तसेच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
राज ठाकरेंची भेट न झाल्याने अमित ठाकरेंची भेट
या पार्श्वभूमीवर भावेश कावरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आला होता. मात्र, राज ठाकरे यांची भेट न झाल्याने त्याने मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे उपशहरप्रमुख योगेश सावंत तसेच भांडुप परिसरातील काही पदाधिकारी उपस्थित होते.
कावरेने या भेटीत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित ठाकरे यांनी त्याचे स्पष्टीकरण ऐकून घेण्याऐवजी त्याला थेट बिनशर्त माफी मागण्याचा सल्ला दिला. या वेळी दोघांमध्ये झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.
‘ती बिल्डिंग शाकाहारी आहे, हे कोण बोललं?’
अमित ठाकरे यांनी कावरेला थेट प्रश्न विचारत, ‘ती बिल्डिंग शाकाहारी आहे, हे कोण बोललं?’ अशी विचारणा केली. त्यावर कावरेने ‘नाही, ते फक्त फ्लॅटसाठी होतं,’ असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या उत्तराने अमित ठाकरे अधिकच संतप्त झाले. ‘फक्त ते फ्लॅटसाठी होतं? मी संपूर्ण व्हिडीओ पाहिला आहे. तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो,’ असे म्हणत त्यांनी कावरेला सुनावले.
केवळ आपली बाजू मांडण्यापेक्षा झालेल्या प्रकाराची जाणीव ठेवून माफी मागणे आवश्यक असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘तुला या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल, याचाही विचार कर,’ अशा शब्दांत त्यांनी कावरेला खडे बोल सुनावले.
‘थोड्या पैशांसाठी मुंबईत तणाव निर्माण करू नको’
या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील सामाजिक वातावरणात अनावश्यक तणाव निर्माण झाल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी कावरेला चांगलेच फटकारले. ‘थोड्याशा पैशांसाठी मुंबईच्या लोकांमध्ये तणाव निर्माण केला. थोड्या पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी हे सगळं केलंस. सोडून द्या ना पैसे,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर सफाई देण्याऐवजी झालेल्या चुकीबद्दल स्पष्टपणे माफी मागणे योग्य ठरेल, असा संदेश अमित ठाकरे यांनी दिला.
मनसेच्या आंदोलनानंतर कावरे पोलिसांत जबाब देणार
दरम्यान, या प्रकरणावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांजूरमार्ग येथील कावरेच्या कार्यालयावर आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली होती. त्यामुळे अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भावेश कावरे कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात जाणार असून तेथे आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे.
मुंबईसारख्या महानगरात घर भाड्याने देताना किंवा विक्री करताना व्यक्तीच्या आहाराच्या सवयींवरून भेदभाव केला जातो का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत नेमके काय समोर येते आणि भावेश कावरे याच्यावर पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

