विटा, सांगली प्रतिनिधी
विटा-खानापूर मार्गावरील रेणावी घाटात गुरुवारी (ता. १३) दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघाताने सांगली जिल्हा हादरला आहे. या अपघातातील गंभीर जखमी महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी चंद्रकांत पवार (वय १७, रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी विट्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. दरम्यान, अद्याप १५ जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात नंदाबाई हरिदास त्रिंबके (वय ६०, खानापूर) आणि धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८/८०, बांबवडे, जि. सातारा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. साक्षी पवार हिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांकडून तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.
३८ प्रवासी जखमी; १७ जणांची प्रकृती गंभीर
रेणावी घाटातील या अपघातात दोन्ही एसटी बसमधील एकूण ३८ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शाळकरी मुले आणि मुलींचाही समावेश आहे. अपघातानंतर गंभीर जखमींना तातडीने विटा तसेच परिसरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यापैकी सात गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.
उर्वरित जखमींवर विट्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊ जण अतिदक्षता विभागात असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता जखमींच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घाटातील अपघाताने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विटा-खानापूर मार्गावरील रेणावी घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून या ठिकाणी दोन एसटी बसची धडक झाल्याने अपघाताची भीषणता वाढली. धडकेनंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिस, प्रशासन आणि बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी समन्वय साधला. जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण तसेच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांची मदत
दरम्यान, रेणावी घाटातील एसटी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन आणि एसटी महामंडळाकडून केला जाणार आहे.
याबाबत आमदार सुहास बाबर यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात आल्याचे बाबर यांनी सांगितले.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
अपघातात १७ वर्षीय साक्षी पवार हिचा मृत्यू झाल्याने ऐनवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. शिक्षण घेण्याच्या वयात साक्षीचा दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन एसटी बसच्या धडकेत आधीच दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात उपचारादरम्यान आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची दाहकता अधिकच वाढली आहे.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या नऊ जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जखमींना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे.

