मंगळवेढा प्रतिनिधी
देशाच्या सीमेचे आणि अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करताना मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावच्या सुपुत्राला वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना १५ कोअर ओपी सिग्नल रेजिमेंटचे जवान वैभव तात्यासो आवताडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मंगळवेढा तालुक्यासह गणेशवाडी गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जवान वैभव आवताडे हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील रहिवासी होते. देशसेवेची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे गणेशवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असला, तरी वीरपुत्राच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रमुख आप्पासाहेब कोडक यांनी जवान वैभव आवताडे यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे.
आज मध्यरात्री पुण्यात पार्थिव दाखल
शहीद जवान वैभव आवताडे यांचे पार्थिव आज रात्री १२.३० वाजता विमानदलाच्या विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात येणार आहे. पुणे विमानतळावरून लष्करी सन्मानासह त्यांचे पार्थिव मूळ गावी गणेशवाडी येथे आणले जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वीर जवानाचे पार्थिव गावात दाखल होताच संपूर्ण गणेशवाडी शोकसागरात बुडणार असून, आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
देशसेवेसाठी दिले प्राणांचे बलिदान
जवान वैभव आवताडे यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या त्यागामुळे मंगळवेढा तालुक्याचे नाव देशसेवेच्या इतिहासात अभिमानाने नोंदले गेले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या या वीरपुत्राच्या बलिदानाला संपूर्ण तालुका सलाम करीत आहे.
‘गणेशवाडीच्या या वीरपुत्राने देशाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावले. त्यांचा हा त्याग मंगळवेढा तालुका कधीही विसरणार नाही,’ अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
जवान वैभव आवताडे यांच्या वीरमरणाची माहिती समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आमदार समाधान आवताडे, सभापती दीपाली आनंद ताड, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे आणि जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण यांनी शहीद जवान वैभव आवताडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तसेच आवताडे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
‘अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमणार गणेशवाडी
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वैभव आवताडे यांच्या पार्थिवाचे गावात आगमन झाल्यानंतर लष्करी सन्मानाने त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. वीरपुत्राच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

