पुणे प्रतिनिधी
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील विधानभवन येथे शनिवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला. तिरंग्याला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची भेट घेत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यपालांच्या हस्ते झालेल्या या मुख्य शासकीय समारंभामुळे विधानभवन परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच सैन्यदलातील अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. तिरंग्याचे ध्वजारोहण होताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करताना त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला.
दरम्यान, राज्याच्या विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करत विकसित आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले.

