मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशात ‘५० ग्रॅम पावडर’ अर्थात अमली पदार्थ टाकून त्यांना तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच पोलीस दलाला पुन्हा एकदा काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यासाठी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात चक्क पोलीस कॉन्स्टेबलच अडकला. ५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) खरेदी करण्यासाठी आलेल्या कॉन्स्टेबल किरण इंदुलकर याला मालवणी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
पोलिसांनी या कारवाईत इंदुलकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून अमली पदार्थांच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, इंदुलकर यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यातच कार्यरत होता. त्या काळात परिसरातील अमली पदार्थांच्या नेटवर्कशी त्याचे कथित संबंध असल्याच्या तक्रारी आणि संशय पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती. मात्र, आता त्याच परिसरात अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तो स्वतः पोहोचल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
तस्कराला पकडण्यासाठी सापळा; जाळ्यात पोलीसच
मालवणी परिसरात अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या टोळीवर पोलिसांची नजर होती. या नेटवर्कमधील प्रमुख व्यक्ती आणि पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यासाठी मालवणी पोलिसांनी सापळा रचला. त्यासाठी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अमली पदार्थ विक्रेत्याच्या भूमिकेत उभे केले आणि संभाव्य ग्राहकाची प्रतीक्षा सुरू केली.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गेट क्रमांक आठजवळ पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. पोलिसांना मुंबईतील विविध भागांतून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा अधिक मजबूत करण्यात आला.
शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचली. त्याने पोलिसांच्या ‘डमी’ विक्रेत्याकडे एमडीची मागणी केली. तपासादरम्यान ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल किरण इंदुलकर असल्याचे स्पष्ट झाले.
१५ हजारांचा व्यवहार अन् तत्काळ अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, इंदुलकरने ५० ग्रॅम एमडीची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात त्याने १५ हजार रुपये देऊन चार ग्रॅम एमडी खरेदी केली. व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले.
अमली पदार्थ खरेदी करणारी व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आल्यानंतर कारवाईला अनपेक्षित वळण मिळाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात इंदुलकर केवळ अमली पदार्थांचा ग्राहक होता की त्याचा या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी खोलवर सहभाग होता, याचा तपास आता केला जात आहे. त्याने यापूर्वी कोणाकडून अमली पदार्थ घेतले, त्याच्या संपर्कात कोण होते, या व्यवहारामागे अन्य कोणी सूत्रधार आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
मालवणीत आधीही संशयाची सावली
किरण इंदुलकर याची सुमारे दोन वर्षांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. या परिसरातील भौगोलिक परिस्थिती तसेच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या स्थानिक टोळ्यांची त्याला माहिती होती. त्याच काळात स्थानिक अमली पदार्थ तस्करांशी त्याचे कथित लागेबांधे असल्याच्या तक्रारीही समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्याला ताकीद देण्यात आली होती आणि त्यानंतर त्याची मालवणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली. मात्र, त्यावेळी या तक्रारींची आणि संशयाची सखोल चौकशी झाली होती का, हा प्रश्न आता त्याच्या अटकेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निलंबन झाले, पुन्हा सेवेत घेतले; आता अमली पदार्थ प्रकरणात अटक
इंदुलकरच्या सेवा नोंदीचीही आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. परवानगीशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहिल्याच्या आरोपावरून त्याच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती. मात्र, काही काळानंतर हे निलंबन मागे घेण्यात आले आणि त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले.
आता अमली पदार्थांच्या व्यवहारात तो रंगेहाथ पकडला गेल्याने त्याच्या पूर्वीच्या सेवा नोंदी, तक्रारी आणि त्याच्यावर झालेल्या कारवायांचा तपशील तपासला जात आहे. पूर्वीच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या गेल्या असत्या तर आजची परिस्थिती टाळता आली असती का, असा सवालही उपस्थित होत आहे.
‘५० ग्रॅम पावडर’ प्रकरणानंतर पुन्हा धक्का
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशात ‘५० ग्रॅम पावडर’ अर्थात अमली पदार्थ टाकून त्यांना तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी पोलीस कर्मचाऱ्याकडून देण्यात आल्याचा आरोप समोर आला होता. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
त्यातच आता प्रत्यक्ष अमली पदार्थ खरेदी करताना एका कॉन्स्टेबलला अटक झाल्याने पोलीस दलासाठी ही घटना अधिकच गंभीर मानली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतीलच एखादा कर्मचारी अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचा संशय निर्माण होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
इंदुलकरचा सहभाग किती खोलवर?
इंदुलकरने यापूर्वीही अशाच प्रकारे अमली पदार्थ खरेदी केले होते का? त्याचे कोणत्या तस्करांशी संबंध होते? त्याला अमली पदार्थ पुरवणारे कोण? त्याने पोलीस कर्मचारी असल्याचा फायदा घेऊन या नेटवर्कला संरक्षण दिले का? तसेच या व्यवहारामागे आणखी काही पोलीस कर्मचारी किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
मालवणी पोलिसांनी इंदुलकरला अटक करून त्याची चौकशी सुरू केली असून अमली पदार्थांच्या या नेटवर्कची मुळे किती खोलवर आहेत, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ एका कॉन्स्टेबलच्या अटकेपुरती मर्यादित न राहता पोलीस दलातील संभाव्य ‘अमली पदार्थ कनेक्शन’ उघड करणारी ठरते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्याच हातात अमली पदार्थ आढळल्याने पोलीस दलाच्या अंतर्गत देखरेखीची यंत्रणा किती सक्षम आहे, याचा गंभीर पुनर्विचार करण्याची वेळ या घटनेने आणली आहे.

