मुंबई प्रतिनिधी
गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नाला आता काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या मालकीच्या कल्याणमधील हेदुटणे आणि मुंबईतील उत्तर शीव येथील सुमारे १३ हेक्टर जागेवर गिरणी कामगारांसाठी सुमारे १२ हजार घरे उभारण्याची योजना म्हाडाने आखली आहे. या घरांचे क्षेत्रफळ प्रत्येकी सुमारे ३०० चौरस फूट असणार असून, दोन्ही ठिकाणच्या जागांची चाचपणी आणि मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कल्याणमधील हेदुटणे येथील ४.७ हेक्टर जागेवर सुमारे ४,५०० घरे, तर उत्तर शीव येथील ७.५ हेक्टर जागेवर सुमारे ७,५०० घरे उभारण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा प्रस्ताव आहे. हेदुटणे येथील जागेची मोजणी पूर्ण झाली असून, उत्तर शीव येथील मोजणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. स्थानिकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीड लाख कामगार, आतापर्यंत केवळ १५ हजारांना घरे
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सुमारे दीड लाख गिरणी कामगारांपैकी आतापर्यंत केवळ १५ हजार कामगारांना घरांचा लाभ मिळाला आहे. उर्वरित कामगारांना अद्याप हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या जमिनीची मर्यादा लक्षात घेता, राज्य सरकारकडून आता मुंबई महानगर प्रदेशातील पर्यायी जागांचा शोध घेतला जात आहे.
शेलू-वांगणीला विरोध; कल्याणचा पर्याय कितपत मान्य?
दरम्यान, राज्य सरकारने शेलू आणि वांगणी येथे मोठ्या प्रमाणावर घरे उभारण्याची तयारी केली आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ८१ हजार घरे उभारण्याची योजना आहे. मात्र, मुंबईतच हक्काचे घर मिळावे, या मागणीवर गिरणी कामगार संघटना ठाम असून शेलू-वांगणीतील प्रकल्पांना कामगारांकडून विरोध करण्यात आला आहे.
त्यामुळे आता कल्याणमधील हेदुटणे येथे प्रस्तावित असलेल्या घरांना गिरणी कामगार कितपत पसंती देतात, याकडे लक्ष लागले आहे. मुंबईत घर देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या कामगारांसमोर कल्याणचा पर्याय स्वीकारण्याचे आव्हान असणार आहे.
स्थानिक विरोधाचा पेच
उत्तर शीव येथील जागेच्या मोजणीवेळी स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या प्रकल्पासमोर आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मागण्या आणि हरकती जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच या जागेवरील पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. त्यामुळे म्हाडाने सुचवलेल्या नव्या जागा, घरांची संख्या आणि मुंबईपासूनचे अंतर याबाबत कामगारांची भूमिका काय राहते, यावर या योजनेचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

