मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आता अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट स्पष्ट करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक व्यवहारिक ज्ञान नसल्यास संबंधित चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील अधिकृतता निलंबित अथवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ‘Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026’ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबच्या चालकांशी संबंधित अधिकृतता आणि परमिटच्या तरतुदींमध्ये व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
नियम ४ मध्ये मराठीच्या ज्ञानाची स्पष्ट अट
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये ‘antecedents’ या शब्दांनंतर ‘and working knowledge of Marathi language’ हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे कार्यकारी, म्हणजेच व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे.
प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना संवादाची अडचण निर्माण होऊ नये, हा या तरतुदीमागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ॲप-आधारित कॅबच्या परमिट नूतनीकरणालाही अट
नियम ८५ मध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सुधारित तरतुदीनुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे. संबंधित प्राधिकरणाला ते ज्ञान समाधानकारक पातळीचे असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे.
नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई
मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याने व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांना नव्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागणार आहे.
‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ नव्हे!
या निर्णयाला ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ असे संबोधणे अचूक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्वतंत्र कायद्यातील तरतूद नसून ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या नियमांमध्ये असलेल्या संदिग्धता आणि त्रुटींमुळे काही अमराठी चालकांकडून मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नियमांची अंमलबजावणी अधिक स्पष्ट आणि परिणामकारक करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
प्रवाशांशी थेट संपर्क असलेल्या व्यावसायिक वाहनचालकांना स्थानिक भाषेत संवाद साधता यावा, यासाठी करण्यात आलेल्या या सुधारणेमुळे आता ‘मराठीचे व्यवहारिक ज्ञान’ ही केवळ अपेक्षा न राहता नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली पात्रता ठरणार आहे.

