मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईकरांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल प्रवासात अडथळ्यांची मालिका पाहायला मिळाली. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड, दादर आणि गोरेगाव येथे पॉइंट बिघाड झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातही तांत्रिक बिघाड झाला. मात्र, मुलुंडमधील बिघाड रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी अवघ्या २४ मिनिटांत दुरुस्त करून लोकल वाहतूक पूर्ववत केली.
मुलुंड स्थानकात नेमकं काय घडलं?
मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात सकाळी ११.५३ वाजता एमआरव्हीसीकडून प्रवासी डेकचे काम सुरू होते. यावेळी बांधकाम साहित्य ओव्हरहेड वायरवर पडले. त्यामुळे वायरमध्ये मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या.
घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वायरची पाहणी केली. वायरवर पडलेले बांधकाम साहित्य हटवण्यात आले आणि आवश्यक तपासणी व दुरुस्तीचे काम करण्यात आले.
दुपारी १२.१५ वाजता बांधकाम साहित्य हटवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १२.१७ वाजता सीएसएमटी दिशेच्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे बिघाडानंतर अवघ्या २४ मिनिटांत वाहतूक सुरू झाली.
पश्चिम रेल्वेवरही तीन ठिकाणी बिघाड
मुलुंडच्या घटनेपूर्वी पश्चिम रेल्वेवरही तीन ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले होते. वसई रोड येथे पहाटे ४.४६ वाजता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाला.
यानंतर दादर येथे सकाळी १०.१० वाजता अप आणि डाऊन जलद मार्गावरील पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे काही जलद लोकल माटुंगा आणि माहीमदरम्यान खोळंबल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या.
त्यानंतर सकाळी १०.२२ वाजता गोरेगाव येथे अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाला. यामुळे सीएसएमटी ते पनवेल तसेच गोरेगावदरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
लोकल २० ते ४० मिनिटे उशिराने
या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. पश्चिम रेल्वेवरील काही जलद लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने, तर काही लोकल ४० मिनिटांपर्यंत उशिराने धावत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
विरार ते चर्चगेट जलद लोकल सुमारे २७ मिनिटे, तर चर्चगेट ते विरार लोकल सुमारे १९ मिनिटे उशिराने धावत होत्या. ग्रँट रोड ते चर्चगेटदरम्यान लोकलच्या फेऱ्या जवळ आल्याने प्रवाशांची गर्दीही वाढली.
एका दिवसात चार तांत्रिक अडथळे
वसई रोड – पहाटे ४.४६: जलद मार्गावरील पॉइंट बिघाड
दादर – सकाळी १०.१०: जलद मार्गावरील पॉइंट बिघाड
गोरेगाव – सकाळी १०.२२: हार्बर मार्गावरील पॉइंट बिघाड
मुलुंड – सकाळी ११.५३: ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडले
मुंबईच्या लोकलला शहराची ‘लाईफलाइन’ म्हटले जाते. त्यामुळे सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवर झालेल्या या तांत्रिक बिघाडांमुळे चाकरमान्यांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागला. मात्र, मुलुंडमधील ओव्हरहेड वायरवरील बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आल्याने सीएसएमटी दिशेची लोकल वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

