सातारा प्रतिनिधी
सातारा : शौर्य, त्याग आणि देशसेवेची परंपरा लाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या सैनिकी वारशात रविवारी आणखी एका अभिमानाच्या पर्वाची भर पडली. सिकंदराबाद येथे भारतीय सेनादलाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून जिल्ह्यातील ३६ युवक अग्निवीर म्हणून मायभूमीत परतले. त्यांच्या आगमनाने सातारा शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
माजी सैनिक संघटना, सैनिक फेडरेशन तसेच नागरिकांच्या वतीने या जवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जवानांच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सातारा जिल्ह्याची ओळख सैनिकी जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या सैनिकी सेवेची परंपरा जपली जाते. देशाच्या सीमेवर शौर्य गाजविणाऱ्या या भूमीने देशाला अनेक वीर जवान दिले आहेत. याच गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेत अवघ्या २० ते २२ वर्षांच्या ३६ तरुणांनी भारतीय सेनादलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
खडतर शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे जवान रविवारी साताऱ्यात दाखल झाले. आपल्या भूमीत परतलेल्या जवानांच्या स्वागतासाठी माजी सैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवानांचे आगमन होताच घोषणाबाजी सुरू झाली. फुलांचा वर्षाव आणि भारतमातेचा जयघोष करत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यानंतर शिवतीर्थ, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या जवानांनी देशसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.
छत्रपती शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेऊन हे तरुण भारतीय सेनादलात सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. साताऱ्याच्या सैनिकी परंपरेचा अभिमान आणि शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी निघालेल्या या ३६ अग्निवीरांचे दिमाखदार स्वागत उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण ठरले.

