छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यांमध्ये १ ते १२ सप्टेंबरदरम्यान युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील यजमान महाविद्यालयांची निवडही निश्चित करण्यात आली असून, महोत्सवाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील सांस्कृतिक, कलात्मक आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हास्तरीय महोत्सवानंतर प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या तीन संघांना विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी ही माहिती दिली.
कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बैठक
युवक महोत्सवासाठी यजमान महाविद्यालयांची निवड आणि आयोजनाच्या नियोजनासाठी विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात झालेल्या या बैठकीत जिल्हानिहाय महोत्सवाच्या तारखा, यजमान महाविद्यालये तसेच आयोजनाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, समिती सदस्य डॉ. योगिता होके पाटील, प्रा. दिलीप महालिंगे, डॉ. दासू वैद्य, डॉ. किशोर शिरसाठ, प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, डॉ. समाधान इंगळे, डॉ. देवराज दराडे, डॉ. संदीप देशमुख आणि सदस्य सचिव डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि सांस्कृतिक विभागप्रमुख उपस्थित होते.
चार जिल्ह्यांमध्ये असे होणार आयोजन
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हानिहाय युवक महोत्सवासाठी महाविद्यालये आणि तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
धाराशिव : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे १ आणि २ सप्टेंबर रोजी युवक महोत्सव होणार आहे.
बीड : पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, ता. परळी वैजनाथ येथे ४ आणि ५ सप्टेंबर रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जालना : लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर येथे ७ आणि ८ सप्टेंबर रोजी युवक महोत्सव होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ११ आणि १२ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय युवक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्रीय युवक महोत्सव ऑक्टोबरमध्ये
गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या वतीने युवक महोत्सवाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात येत आहे. यंदाही कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तसेच केंद्रीय युवक महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
चारही जिल्ह्यांतील जिल्हास्तरीय महोत्सव पार पडल्यानंतर विजेत्या संघांना केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठ परिसरात ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, गणेशोत्सवानंतर हा महोत्सव रंगणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील पारितोषिक विजेत्या प्रथम तीन संघांना केंद्रीय युवक महोत्सवासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
४८४ महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणीची संधी
विद्यापीठाशी संलग्नित तब्बल ४८४ महाविद्यालयांना युवक महोत्सवात सहभागी होता येणार आहे. यासाठी १ ते १७ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित महाविद्यालयांना २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी विकास मंडळ विभागाकडे हार्डकॉपी जमा करावी लागणार आहे.
महाविद्यालयांचे प्राचार्य आणि सांस्कृतिक विभागप्रमुख यांनी युवक महोत्सवाच्या नियमावलीतील सर्व सूचनांची नोंद घेऊन आपल्या महाविद्यालयाच्या संघाची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. तसेच आवश्यक हार्डकॉपी विद्यार्थी विकास विभागातील हरिश्चंद्र साठे यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले आहे.
किमान पाच कला प्रकारांत सहभाग बंधनकारक
यंदाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयासाठी किमान पाच कला प्रकारांमध्ये सहभाग आणि सादरीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना केवळ एका किंवा दोन कलाप्रकारांपुरते मर्यादित न राहता विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे लागणार आहे.
युवक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार असून, जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना पुढे विद्यापीठाच्या केंद्रीय स्तरावरील स्पर्धेत आपली कला सादर करता येणार आहे.
नियमावलीनुसार आयोजन
कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या युवक महोत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, महाविद्यालयांनी नोंदणीपासून स्पर्धेतील सहभागापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
धाराशिवपासून सुरू होणारा हा सांस्कृतिक प्रवास बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

