स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या म्युल अकाउंट रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींच्या नावावर असलेली तब्बल २२ बँक खाती समोर आली असून, या खात्यांशी संबंधित देशभरातील ४२ सायबर तक्रारी आढळून आल्या आहेत. या तक्रारींमध्ये सुमारे ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपयांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा झाला आहे.
खार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या म्युल अकाउंटचे संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या तपासात समोर आले.
या प्रकरणातील फिर्यादीशी आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला होता. ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण ४ लाख ७ हजार ७६४ रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र पैसे जमा केल्यानंतर कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच भारत सरकारच्या सायबर हेल्पलाईन १९३० आणि सायबर समन्वय पोर्टलवरील माहितीचा आधार घेतला. या तपासातून अविनाश बाबासाहेब खरात आणि विकास गजानन भुजबळ यांचा या प्रकरणातील सहभाग समोर आला. त्यानंतर अविनाश खरात याला पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता सायबर फसवणुकीचे धक्कादायक स्वरूप समोर आले. आरोपींनी स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडली होती. ही खाती सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली जात होती. अशा प्रकारे नागरिकांकडून फसवणुकीतून मिळणारी रक्कम या खात्यांमध्ये वळवली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान अविनाश खरात यांच्या नावावरील १३ बँक खाती, तर विकास भुजबळ यांच्या नावावरील ९ बँक खाती, अशी एकूण २२ बँक खाती पोलिसांच्या निदर्शनास आली.
या २२ बँक खात्यांची सायबर समन्वय पोर्टलवर तपासणी केली असता देशभरातून या खात्यांशी संबंधित ४२ तक्रारी नोंद झाल्याचे समोर आले. या तक्रारींमध्ये झालेल्या सायबर फसवणुकीची एकूण रक्कम तब्बल ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपये असल्याचे आढळून आले. आरोपींच्या विविध बँक खात्यांमधून फसवणुकीतील मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, कोणत्या सायबर गुन्हेगारांना ही बँक खाती उपलब्ध करून देण्यात आली आणि फसवणुकीची रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, याचा तपास खार पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी आणि मोठे आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण कारवाईत खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, पोलीस उपनिरीक्षक विजय सैद, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बेडके, पोलीस हवालदार नागेश पाटील, पोलीस शिपाई रुपाली मोटे आणि पोलीस शिपाई गणेश लोटे यांच्या पथकाचा सहभाग होता.

