पणजी:
२०१३ मध्ये देशभरात गाजलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना अखेर मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी (६ ऑगस्ट) पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत तेजपाल यांना दोषी ठरवले. सत्र न्यायालयाने पुराव्यांचे मूल्यमापन करताना गंभीर त्रुटी केल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अपील मंजूर केले.
या निर्णयामुळे तब्बल १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, गोवा सरकारने त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नसल्याचे स्पष्ट करत तो रद्द केला.
राज्य सरकारचा युक्तिवाद ग्राह्य
सत्र न्यायालयाने दिलेल्या तब्बल ५२७ पानी निकालात पीडित महिलेच्या साक्षीचे मूल्यमापन करताना चुकीचा दृष्टिकोन स्वीकारल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला होता. उपलब्ध पुरावे, इलेक्ट्रॉनिक नोंदी, साक्षीदारांचे जबाब आणि घटनाक्रम यांचा योग्य विचार करण्यात सत्र न्यायालय अपयशी ठरल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या सर्व मुद्द्यांचा विचार करत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल उलथवून लावत तेजपाल यांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांच्या ताब्याबाबत आणि शिक्षेसंदर्भातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते.
नेमके प्रकरण काय?
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी येथील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये आपल्या एका कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर तरुण तेजपाल यांनी दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पीडित महिलेने वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर गोवा पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि बेकायदेशीरपणे रोखून धरणे यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
२०२१ मध्ये मिळाली होती निर्दोष मुक्तता
सुमारे सात वर्षे चाललेल्या खटल्यानंतर २१ मे २०२१ रोजी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्यांबाबत संशय व्यक्त करत तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. हा निकाल वादग्रस्त ठरला होता. न्यायालयाच्या निरीक्षणांवर अनेक महिला संघटना, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतले होते.
यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल करून सत्र न्यायालयाने पुराव्यांचे चुकीचे विश्लेषण केल्याचा दावा केला. अखेर उच्च न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद मान्य करत निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द केला.
१३ वर्षांनंतर प्रकरणाला निर्णायक वळण
२०१३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकरणात अनेक वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर हा खटला उच्च न्यायालयात पोहोचला आणि अखेर गुरुवारी उच्च न्यायालयाने दोषी ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यामुळे देशातील गाजलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांपैकी एका प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला निर्णायक टप्पा गाठल्याचे मानले जात आहे.
घटनाक्रम
– ७ नोव्हेंबर २०१३: ग्रँड हयात हॉटेलच्या लिफ्टमध्ये
पहिल्या लैंगिक अत्याचाराची कथित घटना.
– ८ नोव्हेंबर २०१३: त्याच लिफ्टमध्ये दुसऱ्यांदा कथित लैंगिक अत्याचार.
– २१ नोव्हेंबर २०१३: पीडितेच्या ई-मेल तक्रारीनंतर गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल.
– २४ फेब्रुवारी २०१४: पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल.
– २१ मे २०२१: अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता.
– ६ ऑगस्ट २०२६: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले.

