नागपूर प्रतिनिधी
प्रेमसंबंध, लग्नाचा आग्रह, पोलिसांत दिलेली तक्रार आणि त्यातून निर्माण झालेला वाद… या सगळ्याचा शेवट एका २९ वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. खामला परिसरातील रहिवासी अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे हिला तिच्याच प्रियकराने कन्हान नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात ढकलून ठार मारल्याचा आरोप असून, कन्हान पोलिसांनी अवघ्या १८ तासांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.
या प्रकरणी मोनू ऊर्फ आकाश किशोर मनपिया (वय ३१, रा. भिलगाव) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारचा दिवस एकत्र; रात्री पुन्हा भेट
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभर आरोपी आणि अश्विनी एकत्र फिरत होते. दिवसभर त्यांच्यात कोणताही वाद झाल्याचे दिसून आले नाही. सायंकाळी मोनूने अश्विनीला तिच्या घरी सोडले. मात्र रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा तिच्या घरी पोहोचला. त्यानंतर दोघेही अश्विनीच्या मोपेडवरून मोठा ताजबाग आणि पुढे खापरखेडा परिसराच्या दिशेने निघाले.
काही तास दोघांनी एकत्र वेळ घालवल्यानंतर पहाटे २ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास ते कन्हान नदीच्या पुलावर पोहोचले. याच ठिकाणी लग्नाचा आग्रह आणि यापूर्वी अश्विनीने पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
संतापाच्या भरात पुलावरून नदीत ढकलले
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने अश्विनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापाच्या भरात तिला थेट पुलावरून खाली वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत, म्हणजे पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी आरोपी अश्विनीची मोपेड घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
रेल्वे कर्मचाऱ्यामुळे उलगडला गुन्हा
ही संपूर्ण घटना पुलालगत कामावर असलेल्या एका रेल्वे ट्रॅकमॅनने प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी तातडीने कन्हान पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आणि तिची ओळख पटवली.
त्यानंतर प्रत्यक्षदर्शीचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. अवघ्या १८ तासांत आरोपी मोनू मनपियाला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
लग्नाच्या आग्रहातून टोकाचे पाऊल
प्राथमिक तपासानुसार, अश्विनी आरोपीकडे लग्नाचा आग्रह धरत होती. तसेच यापूर्वी तिने दिलेली पोलिस तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आरोपी संतप्त होता. याच कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कन्हान पोलीस करत असून, आरोपीकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी चौकशी सुरू आहे.


