मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच आणखी एका महत्त्वाच्या महिला पदाधिकाऱ्याने पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर राणे यांनी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत पक्षातील घडामोडींना वेग आला असून, काही माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता वैशाली दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आणखी एक धक्का मानला जात आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
वैशाली दरेकर राणे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक म्हणून कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी कल्याण मतदारसंघातून उबाठा पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला आवश्यक वेळ देता येत नसल्याचे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा सादर केला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, “मी महिला जिल्हा संघटक या पदावर गेली दोन वर्षे कार्यरत आहे. मात्र, सध्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे या पदाला अपेक्षित न्याय आणि वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे मी स्वेच्छेने माझ्या पदाचा राजीनामा देत असून तो स्वीकारावा,” अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
वैशाली दरेकर यांच्या राजीनाम्यानंतर त्या पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांनी अद्याप आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.


