स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : बेस्ट बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या सराईत मोबाईल चोरांच्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तब्बल १३५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत १२ लाख ६७ हजार ५०० रुपये असून, या कारवाईमुळे मोबाईल चोरीचे किमान तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओएनजीसी कॉलनी, पुनमनगर येथील रहिवासी जगत ज्योती मोहंती (वय ५९) यांनी ६ जून २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. सिप्झ बसथांब्यावरून अंधेरी स्थानकाकडे जाणाऱ्या बेस्ट बस क्रमांक ४१५ मधून प्रवास करत असताना त्यांच्या पँटच्या खिशातून सुमारे ९० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस-२५ अल्ट्रा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक किरण नवले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल ४० ते ४५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुंब्रा व शिवाजीनगर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी बेस्ट बसमधील प्रचंड गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरत असल्याची कबुली समोर आली.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या १३५ मोबाईल फोनमुळे मुंबईतील मोबाईल चोरीच्या आणखी अनेक प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीचा गुन्हेगारीचा विस्तार किती मोठा आहे, याचा तपास आता एमआयडीसी पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील करांडे, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.


