सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवून तेथील तलाव व बंधारे भरावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुरस्थिती व आपत्कालीन उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई यांनी धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. सखल भागात किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले.
यावेळी त्यांनी अतिरिक्त पावसामुळे नद्यांमध्ये येणारे पाणी वाया जाऊ न देता कालवे आणि उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये सोडण्याचे नियोजन करण्यावर भर दिला. यामुळे दुष्काळी तालुक्यांतील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
पाटण तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. ज्या गावांच्या पुनर्वसनासाठी अद्याप जागा उपलब्ध नाही, त्या गावांसाठी संबंधित विभागांनी तातडीने क्षेत्रीय पाहणी करून योग्य जागेचा शोध घ्यावा आणि पुनर्वसनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले.


