स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-६च्या पथकाने जेरबंद केले आहे. खारघर परिसरातून ही धडक कारवाई करण्यात आली असून, सुमित स्वस्तिक सावंत (वय ३२, रा. चुनाभट्टी) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (गुन्हा क्रमांक ५४४/२०२३) खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे, शस्त्र अधिनियम आणि मोक्का कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपीने मुख्य सूत्रधारांना अवैध अग्निशस्त्र पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी सावंत हा अत्यंत चलाखीने लपून राहत होता. त्याने सिंधुदुर्ग, गोवा, चेन्नई, राजस्थान आणि दिल्लीसह देशातील विविध शहरांत ठाण मांडले होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक त्याच्या सतत पाळतीवर होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तो नवी मुंबईतील खारघर परिसरात असल्याची पुष्टी केली. त्यानंतर पोलिसांनी खारघरमधील सेक्टर-१९ येथील गीतांजली ज्वेलर्स परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कक्ष-६चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, रूपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, संदीप रहाणे, कल्पना माशेरे, सुहास देसाई तसेच अंमलदार गायकवाड, खेडकर आणि उर्मिला शेवाळे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.


