छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर देशभरातील विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व आणि त्यातील आक्रमक भूमिका यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
अभिजीत दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून, दिल्लीतील आंदोलनानंतर त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. आंदोलन संपल्यानंतर आता राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
अभिजीत दिपके यांच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी या भेटीमागील भूमिका स्पष्ट केली. दिपके कुटुंबाशी आपले जुने आणि कौटुंबिक संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दिल्लीतील आंदोलन सुरू असताना आपण जाणीवपूर्वक त्यांच्या घरी गेलो नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
‘‘दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. मात्र, आंदोलन सुरू असताना या प्रकरणाला कोणत्याही प्रकारचे राजकीय वळण लागू नये, अशी आमची भूमिका होती. त्यामुळे त्या काळात मी त्यांच्या घरी गेलो नाही. आता आंदोलन संपले आहे. अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या घरी आलो आहे. सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल,’’ अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, शिरसाट यांच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनीही प्रतिक्रिया दिली. पालकमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आपल्या मनातील प्रश्न दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या काळात राजकारण होऊ नये, यासाठी शिरसाट घरी आले नव्हते, हे आता स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘‘मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनातील प्रश्न मिटला आहे. आंदोलन सुरू असताना राजकारण होऊ नये, यासाठी ते त्या काळात घरी आले नव्हते. आता आंदोलनाला यश मिळाले आहे, याचा आम्हाला आनंद आहे,’’ अशी प्रतिक्रिया भगवान दिपके यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरपासून दिल्लीपर्यंत राजकीय चर्चांना वेग आला आहे. आंदोलनाला मिळालेले यश आणि त्यानंतर दिपके यांच्या घरी झालेली पालकमंत्री शिरसाट यांची भेट यामुळे या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र, शिरसाट यांनी या भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘इंडिया आघाडी ब्लॉक झाली’; शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीच्या राजकीय भवितव्याबाबत भाष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीबाबत संजय शिरसाट यांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका केली.
‘‘इंडिया आघाडी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच ब्लॉक झाली आहे. या आघाडीतील पक्षांमध्ये कुठेही एकवाक्यता राहिलेली नाही. दिल्लीतील आंदोलनातही प्रत्येकजण आपापले आंदोलन करत होता आणि आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू होती. त्यामुळे आता इंडिया आघाडी राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांनाही मान्य करावीच लागेल,’’ असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येण्याऐवजी स्वतंत्रपणे राजकीय भूमिका घेत असल्याचे सांगत शिरसाट यांनी इंडिया आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे दिपके यांच्या घरी झालेल्या भेटीबरोबरच इंडिया आघाडीवर केलेल्या या वक्तव्यामुळेही शिरसाट यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेले यश, दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या घरी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट आणि त्यानंतर इंडिया आघाडीवर केलेली टीका, यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.


