नवी दिल्ली प्रतिनिधी
पेपरफुटीच्या घटनांवरून देशभरातील विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मोठी घोषणा केली. पेपरफुटीच्या प्रकरणांतील दोषींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्याची घोषणा मोदी यांनी केली. मात्र, या घोषणेनंतरही सरकारसमोरील राजकीय आणि विद्यार्थी आंदोलनाचे संकट तूर्तास कमी झालेले दिसत नाही. काँग्रेससह ‘कॉकरोच जनता पार्टी’ने मोदी यांच्या घोषणेवरून सरकारला लक्ष्य केले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली. युवकांच्या भवितव्याचा सर्वाधिक फटका सध्याच्या व्यवस्थेला बसला असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
‘तुम्हीच आपल्या युवकांच्या भवितव्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे. तुम्ही केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्णपणे कब्जा केला नाही, तर ती संपविण्याचेही प्रयत्न केले. त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘तीन मागण्या मान्य करा’
विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सरकारसमोर तीन मुद्दे मांडले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटविणे, विद्यार्थ्यांची माफी मागणे आणि विद्यार्थ्यांवर कथित अत्याचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे, या तीन मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
त्यामुळे केवळ फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा करून विद्यार्थी आंदोलन शांत होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधकांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरल्याने आगामी संसद अधिवेशनात या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.
अभिजीत दीपकेंचा ‘नथिंग’चा टोला
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेवर एका शब्दात प्रतिक्रिया देत सरकारला लक्ष्य केले आहे. मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या सुरुवातीलाच ‘नथिंग इज मोअर इम्पॉर्टंट दॅन द वेल्फेअर अँड फ्यूचर ऑफ अवर यूथ’ असे म्हटले होते.
याच वाक्यातील ‘नथिंग’ या शब्दाचा संदर्भ घेत दीपके यांनी सोशल मीडियावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत त्यावर ‘हाय, माय नेम इज नथिंग’ अशी उपरोधिक टिप्पणी केली.
दीपके यांच्या या एका वाक्यातून त्यांची भूमिका स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली आहे. सरकारने फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा केली असली, तरी प्रधान यांच्या राजीन्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असा दीपके यांचा आक्षेप आहे.
त्यामुळे पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला न्यायालयीन कारवाईच्या घोषणेने काही प्रमाणात दिलासा मिळणार की, शिक्षणमंत्र्यांच्या राजीन्याच्या मागणीमुळे आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. मोदींच्या घोषणेनंतरही राहुल गांधींच्या तीन मागण्या आणि अभिजीत दीपकेंचा ‘नथिंग’चा टोला सरकारसमोरील राजकीय आव्हान कायम असल्याचे संकेत देत आहे.


