नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांचीही विशेष उपस्थिती होती. या भेटीदरम्यान प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे चार छायाचित्रे शेअर करत या भेटेची माहिती दिली आहे. या चर्चेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, देशात वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यावर शाश्वत उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाल्याचे समजते. यावर पंतप्रधान मोदींनी आपली भूमिकाही पवारांसमोर मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Rajya Sabha MP Shri @PawarSpeaks Ji and Lok Sabha MP Smt. @supriya_sule Ji called on PM @narendramodi in Parliament earlier today. pic.twitter.com/DwTspUA0th
— PMO India (@PMOIndia) July 22, 2026
छायाचित्रांमधून काय आले समोर?
पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या चारही फोटोंमध्ये दोन्ही नेत्यांमधील गंभीर चर्चा स्पष्टपणे दिसून येत आहे. एका छायाचित्रामध्ये खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित असल्याचे दिसते. शरद पवारांच्या हातात एक महत्त्वाची फाईल असून, त्यातील एक कागदपत्र (निवेदन) त्यांनी पंतप्रधान मोदींनकडे सुपूर्द केल्याचे दिसत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाशी संबंधित हे निवेदन असल्याचे मानले जात असून, मोदी हे कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक वाचताना दिसत आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, भेटीच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी अत्यंत आदराचे धोरण दाखवत शरद पवारांचे हात हातात घेऊन त्यांच्यासोबत चालतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी थेट जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. आंदोलक विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी आणि देशपातळीवर विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवण्यासाठी खुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतरमंतर गाठले होते. यावेळी त्यांनी आंदोलकांची विचारपूस करत काही मदतीची आवश्यकता आहे का, अशी विचारणाही केली होती.
विद्यार्थ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर आता थेट संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात उच्च पातळीवर चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन या भेटीची सविस्तर माहिती माध्यमांसमोर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


