नागपूर प्रतिनिधी
शहरातील बँकांच्या एटीएम केंद्रांची सुरक्षा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. बुधवारी पहाटे अवघ्या काही तासांच्या अंतराने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम मशीन कापून तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. तर हुडकेश्वर रोडवरील इंगोळे नगर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मशीनमधील रोकड सुरक्षित राहिल्याने मोठा आर्थिक फटका टळला.
या सलग दोन घटनांमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चोरट्यांनी वापरलेली पद्धत अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यामागे आंतरराज्यीय सराईत टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणा मार्गावरील डोंगरगावातील ताज सैलानी इमारतीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. बुधवारी पहाटे सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले. चेहऱ्यावर मास्क, हातात अत्याधुनिक गॅस कटर आणि इतर साहित्य घेऊन आलेल्या आरोपींनी प्रथम एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करण्याचा प्रयत्न केला. कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक कॅमेरा सुरू राहिल्याने आरोपींच्या हालचाली त्यामध्ये कैद झाल्या आहेत.
यानंतर आरोपींनी अवघ्या दहा मिनिटांत दोन्ही एटीएम मशीन गॅस कटरने कापली. एका मशीनमधून सुमारे १२ लाख ४५ हजार रुपये, तर दुसऱ्या मशीनमधून एक लाख रुपये अशी एकूण १३.४५ लाख रुपयांची रोकड त्यांनी पिशव्यांमध्ये भरून घटनास्थळावरून पलायन केले. मशीन कापताना निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे आतील वायरिंगला आग लागली होती.
दरम्यान, पहाटे इमारतीच्या मालकाला धूर दिसल्याने आणि जळक्या वायरचा तीव्र वास आल्याने त्यांनी खाली धाव घेतली. एटीएम केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यानंतर मशीन फोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याच वेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हुडकेश्वर रोडवरील इंगोळे नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला असला, तरी तांत्रिक अडथळ्यांमुळे आरोपींना रोकड काढण्यात यश आले नाही. त्यामुळे लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. या दोन्ही घटना एकाच टोळीने घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
दोन्ही घटनांचा तपास हिंगणा व हुडकेश्वर पोलिसांसह गुन्हे शाखेची विशेष पथके करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील वाहनांच्या नोंदी, संशयित एसयूव्ही वाहनाचा मार्ग, तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपींची काम करण्याची पद्धत, गॅस कटरचा वापर आणि काही तांत्रिक बाबी लक्षात घेता हरियाणातील आंतरराज्यीय एटीएम फोड्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये अशाच पद्धतीने एटीएम फोडून चोरी करणाऱ्या टोळ्यांच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागपुरातील या दोन घटनांनाही गंभीरतेने घेत पोलिसांनी विविध राज्यांतील गुन्हेगारांच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, शहरातील एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती, अनेक ठिकाणी अलार्म यंत्रणा प्रभावी नसणे आणि रात्रीच्या वेळी अपुरी गस्त यामुळे एटीएम केंद्रे चोरट्यांचे सहज लक्ष्य ठरत असल्याची बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बँकांना एटीएम सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने सुरू केली असून, रात्रीच्या गस्तीमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


