कराड प्रतिनिधी
शहरात बेकायदा शस्त्रविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेने चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे तसेच इतर मुद्देमाल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणारे व त्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कराड येथील शासकीय रत्नागिरी गोदामाच्या पाठीमागील ईदगाह मैदान परिसरात काही तरुण शस्त्रविक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरात सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत अफताब बादशाह मोमीन (२४), रेहान मेहबूब शेख (१९, दोघे रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (२३, रा. काले, ता. कराड) आणि ओंकार प्रकाश हिंगणे (२५, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत चार देशी बनावटीची पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. पोलीस हवालदार संदीप कुंभार यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेली शस्त्रे संशयितांनी कुठून आणली, त्यामागील मुख्य पुरवठादार कोण आहे, तसेच ही शस्त्रे कोणाला विकली जाणार होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे शहरातील बेकायदा शस्त्रविक्रीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


