श्रीरामपूर प्रतिनिधी
जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून श्रीरामपूर शहरात हृदयद्रावक हत्याकांड घडले. मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसोबत असलेल्या काही स्थानिक तरुणांनी हॉटेलमधील वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात करत हॉटेल मालक चंद्रशेखर उर्फ शेखर वेंकटरमन दुबय्या (वय ३४) यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरासह अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
ही घटना श्रीरामपूर शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे रविवारी दुपारी घडली. पोलिसांनी मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ या तिघांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेले मुंबईचे दोघे पाहुणे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेले दोन पाहुणे हॉटेलमध्ये मुक्कामी उतरले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली; मात्र ती मिळण्यास काहीसा विलंब झाला. यावरून त्यांनी व त्यांच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्थानिक तरुणांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्याशी वाद घालत मारहाण सुरू केली.
प्रसंग शांत करण्यासाठी हॉटेल मालक शेखर दुबय्या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र संतापलेल्या आरोपींनी हॉटेलमधील टी-पॉयसह जड वस्तूंनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्ला थांबविण्यासाठी धावून गेलेल्या चुलत भावाला कुणाल दुबय्या यालाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान, प्रवासावरून नुकतेच हॉटेलमध्ये पोहोचलेले शेखर दुबय्या यांचे वडील मध्यस्थी करत असताना आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
संपूर्ण हल्ल्याचे दृश्य हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत यश जाधव आणि ओम डफळ यांना अटक केली. यशला रुग्णालयाच्या बाथरूममधून, तर ओमला सेवा नर्सिंग स्कूल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी सूरज जाधव हा हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
आरोपी नर्सिंगचा विद्यार्थी
या प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमीही धक्कादायक आहे. मुख्य आरोपी सूरज जाधव याची बसस्थानकाजवळ चिकन टिक्क्याची गाडी आहे. यश जाधव त्याच्याकडे काम करतो. तर ओम डफळ हा साखर कामगार रुग्णालयाच्या सेवा नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असून रुग्णालयामागील भाड्याच्या खोलीत राहत होता.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशय
मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसोबत स्थानिक आरोपींनी मद्यप्राशन केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुख्य मारहाणीच्या वेळी मुंबईचे दोघे पाहुणे सीसीटीव्हीत दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुख्य आरोपी सूरज जाधव हा परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली असून, या दुव्याचाही तपास सुरू आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक विशाल खैरे, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे भौतिक आणि तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


