मुंबई/नाशिक प्रतिनिधी
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे. सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश केल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाने तातडीची बैठक घेत पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत गटनेते केशव पोरजे यांनी पक्षातील कोणताही नगरसेवक फुटणार नसल्याचा ठाम दावा करत विरोधकांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.
पोरजे म्हणाले, “नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार आहेत. काल आम्ही मनपा आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो असताना आमचे १३ नगरसेवक उपस्थित होते. आमच्यात संशयाचे वातावरण निर्माण करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तो कधीही यशस्वी होणार नाही.”
‘५ कोटींची ऑफर’चा गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत पोरजे यांनी धक्कादायक दावा करत काही मध्यस्थ नगरसेवकांशी संपर्क साधत असल्याचे सांगितले. “आमच्याकडे एजंट पाठवले जात आहेत. विकासकामांच्या नावाखाली प्रत्येकी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. पाच ते सहा नगरसेवकांशी अशा प्रकारचा संपर्क साधण्यात आला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
‘निधी रोखून पक्षांतरासाठी दबाव’
महापालिकेत विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकासनिधी मिळत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. “अधिकारी आमच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष करत आहेत. निधी नाकारला जात आहे. त्यामुळे नगरसेवक कंटाळून पक्ष बदलतील, अशी रणनीती आखली जात आहे. मात्र आमचे नगरसेवक अशा दबावाला बळी पडणार नाहीत,” असे पोरजे यांनी स्पष्ट केले.
‘जनता धडा शिकवेल’
संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी इशाराही दिला. “दोन-चार नगरसेवक घेऊन गेल्याने काहीही साध्य होणार नाही. अशा प्रकारे जाणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. अशा लोकांना जनताच धडा शिकवेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, आगामी काही दिवसांत ठाकरे गटातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सर्व चर्चांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत पक्ष एकसंध असल्याचा दावा केला आहे.


