रायगड / पेण प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत ही गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली असताना प्रसूतीच्या उंबरठ्यावर असलेल्या दोन गर्भवती महिलांची जिल्हा प्रशासन आणि ‘आपदा मित्र’ यांच्या समन्वयातून सुखरूप सुटका करण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेमुळे दोन्ही महिलांना वेळेत रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.
रावे येथील पायल राजेश पाटील (वय २३) या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना दिली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना तातडीने बचाव पथक रवाना करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, रावे गावाकडे जाणारे सर्व मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने तेथे पोहोचण्यासाठी रबर बोटीचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. पाण्याचा वेग आणि वाढलेली पातळी यामुळे बचाव मोहीम अधिक आव्हानात्मक ठरत होती. अशा परिस्थितीत विशेष प्रशिक्षण घेतलेले ‘आपदा मित्र’ अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी रबर बोटीच्या साहाय्याने गावात प्रवेश केला. त्यांनी पायल पाटील यांच्यासह अन्य चार जणांना सुरक्षित बाहेर काढले. किनाऱ्यावर आधीच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याने पायल पाटील यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिली मोहीम पूर्ण झाल्यानंतर लगेचच तांबडशेत गावातून आणखी एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिला पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. कोणताही विलंब न करता त्याच पथकाने दुसऱ्या बचाव मोहिमेसाठी पुन्हा प्रस्थान केले. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत संबंधित महिलेलाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
सलग दोन धोकादायक बचाव मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत ‘आपदा मित्र’ अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी प्रशिक्षण, प्रसंगावधान आणि सेवाभावाचे उदाहरण घालून दिले. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, स्थानिक महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वयामुळे दोन्ही गर्भवती महिलांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध झाली.
या बचाव मोहिमेमुळे माता आणि गर्भातील बाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असून, प्रशासन आणि बचाव पथकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.


